औरंगाबाद : काँग्रेसचे दिग्गज नेते अब्दुल सत्तार (Abdul Sattar in Shivsena) यांनी भाजपात जाण्याचे संकेत देता-देता अचानक शिवसेनेत प्रवेश करून अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला. अब्दुल सत्तार हे औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड मतदारसंघातले लोकप्रिय आमदार आहेत. अल्पसंख्याक समुहातून येऊन त्यांनी या मतदारसंघात आपला दबदबा निर्माण केला. कोणत्याही एका जातीच्या जीवावर राजकारण करण्याऐवजी अब्दुल सत्तार (Abdul Sattar in Shivsena) यांनी सर्व जातीधर्मात आपले समर्थक निर्माण करून आपलं राजकीय वर्चस्व कायम राखलं. जिल्ह्यातील शिवसेनेने सत्तार यांचं स्वागत केलंय. पण पुढील वाट त्यांच्यासाठी खडतर असणार आहे.
गेली अनेक वर्ष आमदार असलेल्या अब्दुल सत्तार यांनी अशोक चव्हाण हे मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणूनही काम केलं. सुरुवातीला विलासराव देशमुख आणि त्यानंतर अशोक चव्हाण आणि शेवटी शेवटी राधाकृष्ण विखे पाटील समर्थक म्हणून त्यांची ओळख होती. राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश मिळवून स्वतःची मंत्रिपदी वर्णी लावली. पण अब्दुल सत्तार मात्र भाजपच्या दारावर ताटकळत राहिले.
भाजपऐवजी शिवसेनेत गेल्यामुळे आश्चर्य
सुरुवातीला अब्दुल सत्तार यांचा भाजपात प्रवेश करण्यासाठी जास्त आग्रह होता, यासाठी त्यांनी दोन वेळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अनेक वेळा तत्कालीन प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची भेट घेतली. पण सिल्लोड मतदारसंघातील भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी अब्दुल सत्तार यांच्या भाजप प्रवेशाला कडवा विरोध केला. त्यामुळे अब्दुल सत्तार यांचा भाजप प्रवेश लांबणीवर पडला. मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्र्यांनी अब्दुल सत्तार यांना थेट हाताला धरून यात्रेच्या रथावर खेचून घेतलं, त्यावेळी अब्दुल सत्तार यांचा भाजप प्रवेश नक्की मानला जात होता. मात्र या घटनेनंतर चारच दिवसात अब्दुल सत्तार यांनी शिवसेना प्रवेश केल्यामुळे सगळीकडे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
मुस्लीम समाज सत्तारांसोबत राहिल?
ज्या सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून अब्दुल सत्तार सातत्याने निवडून येतात, त्या मतदारसंघात मुस्लीम समाजाची निर्णायक मते आहेत. या मतांना सोबत घेऊन इतर समाजाचा विश्वास संपादन करून अब्दुल सत्तार हे सातत्याने विधानसभेवर निवडून गेले. पण आता अब्दुल सत्तार यांनी कट्टर हिंदुत्ववादी शिवसेनेचे शिवबंधन हातात बांधलंय. त्यामुळे ज्या मुस्लीम समाजाने अब्दुल सत्तार यांना विधानसभेवर अनेकवेळा पाठवलं, तो मुस्लीम समाज आता नक्की काय निर्णय घेईल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
मुस्लीम मतांच्या जोरावर राज्यात राजकारण करणाऱ्या एमआयएम या पक्षाला राज्यात अनेक मुस्लीमबहुल ठिकाणी चांगलं यश मिळालं. पण अब्दुल सत्तार यांच्यामुळे या पक्षाला सिल्लोड मतदारसंघात अजूनही प्रवेश करता आला नव्हता. मात्र सत्तार यांच्या भाजप प्रवेशानंतर सिल्लोड मतदारसंघातला मुस्लीम समाज एमआयएमला जवळ करतो का अशी शंका राजकीय विश्लेषकांना आहे. नेमकं याच गोष्टींचा फटका अब्दुल सत्तार यांना बसेल का याचीही भीती अनेकांनी व्यक्त केली आहे.
दुसऱ्या बाजूला भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी अब्दुल सत्तार यांच्या भाजप प्रवेशाला कडाडून विरोध केला होता. आता सत्तार शिवसेनेत गेल्यामुळे भाजपातले सत्तरांचे विरोधक सत्तार यांना मदत करतील का असाही प्रश्न आहे. त्यामुळे अब्दुल सत्तार यांनी शिवसेनेचे शिवबंधन मनगटावर बांधले असले तरी विधानसभेचा रस्ता मात्र त्यांच्यासाठी खडतर असणार आहे.