जालना : लोकसभा निवडणुकीत दारुण परभाव स्वीकारल्यानंतर विधानसभेसाठी जोमात सुरुवात करावी, तर तिथेही अडचणींना सामोरं जावं लागतंय, अशी स्थिती सध्या राज्यात काँग्रेसची झाली आहे. काँग्रेसचे राज्यातील वरिष्ठ नेते आणि विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार असून, आपण आणि सोबत दहा आमदारही भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, अशी माहिती काँग्रेसचे सिल्लोडचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांनी सांगितले. आमदार अब्दुल सत्तार यांनी काल भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेतली. त्यानंतर स्थानिक पत्रकारांशी संवाद साधला.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आमदार अब्दुल सत्तार यांनी रावसाहेब दानवे यांच्याविरोधात अटीतटीची भूमिका घेतली होती. रावसाहेब दानवेंच्या पराभवासाठी आपण वाट्टेल ते करु, असा इशाराच अब्दुल सत्तार यांनी दिला होता. मात्र, सत्तारांचा इशारा आता मावळला असून, ते दानवेंच्याच हजेरीत भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत.
“रावसाहेब दानवे यांना पराभूत केल्याशिवाय डोक्यावर केस उगवू देणार नाही.”, या रावसाहेब दानवेंवर लोकसभा निवडणुकीदरम्यान केलेल्या टीकेबाबत अब्दुल सत्तार यांना विचारले असता, ते म्हणाले, “रावसाहेब दानवे मला कंगवाही देतील आणि भांग पण पाडून देतील”
यावेळी अब्दुल सत्तार यांनी काँग्रेसला धक्का देणारी माहिती सुद्धा सांगितली. काँग्रेसचे वरिष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्त्वात 10 आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, अशी माहिती काँग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांनी दिली.
आता विखेंसोबत भाजपवासी होऊ पाहणारे हे 10 आमदार कोण, याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. अब्दुल सत्तार हे दहापैकी एक आमदार असतील. मात्र, इतर 9 कोण असा प्रश्न आहे. त्यात काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे साताऱ्यातील आमदार जयकुमार गोरे यांनी भाजपचे नेते आणि राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली होती. विकासकामांसाठी भेट असल्याचे गोरे यांनी सांगितली असली, तरी सद्यस्थिती पाहता, या भेटीवरुनही राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते.
विखे पाटील नाराज
मुलगा सुजय विखे पाटील यांना काँग्रेस-राष्ट्रवादीने नगर दक्षिणमधून लोकसभेचं तिकीट न दिल्याने राधाकृष्ण विखे पाटील नाराज झाले होते. राष्ट्रवादीने ही जागा काँग्रेससाठी आणि पर्यायाने सुजय विखेंसाठी सोडण्यास स्पष्ट नकार दिला होता. त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी आघाडीविरोधात जाहीर नाराजीही व्यक्त केली होती. किंबहुना, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधातही नाराजी बोलून दाखवली होती. आता ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. फक्त विखेंच्या भाजप्रवेशाचा मुहूर्त कधी निघतो आणि त्यांच्यासोबत किती आमदार भाजपमध्ये सामील होतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.