केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येमुळे सगळ्या राज्यात खळबळ उडाली आहे. या घटनेने बीड जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. विधानसभेत आमदार संदीप क्षीरसागर यांनी हा मुद्दा लावून धरला आहे. हिवाळी अधिवेशनात या हत्येचे पडसाद उमटले आहेत. आता शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काही मुद्दे उपस्थित केले आहेत. “मला नाही वाटत, सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणात पंकजा मुंडे यांचा काही संबध असेल पण वाल्मिक कराड हा कोण आहे? त्याला का संरक्षण दिलं जात आहे, याचा तपास झाला पाहिजे” अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली.
“सुरेश धस सातत्याने आका बोलत आहेत. पण त्या ‘आका’च नाव का ते घेत नाहीत? घाबरत आहेत का ते, नाव घेण्यापासून. मग आपण लोकप्रतिनिधी आहोत ना, आपण न्याय कसा द्यायचा लोकांना?” असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासंबंधी भाजपकडून जो इतिहास सांगितला जातोय, त्यावर त्यांनी त्यांचे विचार मांडले.
‘आत्ता चुकीचा इतिहास भाजप मांडत आहे’
“बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल खोटा इतिहास पसरवला जात आहे. त्यामुळे एक फेक नरेटिव्ह तयार होत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना काँग्रेसने मुंबईतून निवडून दिलं आहे, याची माहिती इतिहासात आहे. जयकर कुटुंबीयांची खासदारकी पद काढून आंबेडकर यांना खासदार बनवल गेलं होतं. पण आत्ता चुकीचा इतिहास भाजप मांडत आहे” असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
कल्याणमध्ये मराठी कुटुंबाला झालेल्या मारहाणीवर काय म्हणाले?
“मिळून मिसळून राहू. आमच्या व्यवहारामुळे दुसऱ्याची अडचण होणार नाही हे पाहू. जितकी श्रद्धा माझं जे काही आहे, त्या विषयी माझी आहे, तितकीच श्रद्धा दुसऱ्याच जे आहे त्या विषयी असेल” असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत म्हणाले. त्यावर जितेंद्र आव्हाड म्हणाले की, “मोहन भागवत यांनी योग्य वक्तव्य केल आहे आणि याचं समर्थन मी करतो. कारण कधी पर्यंत ही धार्मिक हिंसा आपण पहावी. आपली प्रगती अशामुळे होणार नाही” “कल्याणमध्ये एका मराठी कुटुंबाला मारहाण झाली, त्याला मुजोर प्रवृत्ती म्हणतात. मुख्यमंत्री कार्यालयाच्या धमक्या देण हे योग्य नाही” असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.