ठाणे : कल्याण शीळ रोडवर असलेल्या खड्ड्यांवरुन कल्याण-डोंबिवलीतील राजकारण चांगलंच तापलं आहे. विशेष म्हणजे खड्डे बुजवण्याच्या कामाला अद्यापही हवी तशी गती मिळालेली नाही. मात्र, राजकारण प्रचंड तापताना दिसत आहे. शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी मनसे आमदार राजू पाटील यांना कल्याण शीळ रस्त्यावर फेरफटका मारण्याचा सल्ला दिल्यानंतर राजू पाटील आज (26 ऑगस्ट) थेट श्रीकांत शिंदे यांच्या बंगल्याबाहेर दाखल झाले. यावेळी त्यांनी श्रीकांत शिंदे यांच्या बंगल्याबाहेरील खड्डा दाखवला (MLA Raju Patil showed the pits outside the house of MP Shrikant Shinde).
“मला फेरफटका मारण्याची गरज नाही. मी या मतदारसंघातच राहतो. मला या मतदारसंघाची पूर्ण माहिती आहे. मतदारसंघ हेच माझं घर आहे. आता राजकारण न करता खड्डे भरण्याचं काम करा”, असा सल्ला राजू पाटील यांनी श्रीकांत शिंदे यांना दिला (MLA Raju Patil showed the pits outside the house of MP Shrikant Shinde).
दरम्यान, राजू पाटील यांनी श्रीकांत शिंदे यांच्या घराबाहेरील रस्ते दाखवल्यानंतर खासदार शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. “आमदार राजू पाटील यांनी माझ्या बोलण्याची दखल घेतली आणि ते रस्त्यावर उतरले याबद्दल धन्यवाद! फुल टाईम आणि पार्ट टाईम लोकप्रतिनिधी कोण आहे, हे जनतेला चांगलंच माहिती आहे. चार महिने ट्विटरवर कोण होतं आणि रस्त्यावर उतरुन कोणी कामं केली हे जनतेला माहिती आहे. त्यामुळे त्यांनी मला कोण फुल टाईम आणि पार्ट टाईम हे सांगू नये”, अशी सडेतोड प्रतिक्रिया श्रीकांत शिदे यांनी दिली.
हेही वाचा : ट्विटरवर मागणी आणि ट्विटरवर फॉलोअप, मनसे आमदारांनी एकदा शीळ फाट्यावर फेरफटका मारावा : खा. श्रीकांत शिंदे
नेमकं प्रकरण काय आहे?
कल्याण शीळ रोडवरील रस्त्यावरचे खड्ड्यांमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे तीन तास वाहनचालकांना वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागते. या ठिकाणी आतापर्यंत खड्डे बुजवण्याचे काम झाले नाही. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठाण्याप्रमाणेच डोंबिवलीतही सहज फेरफटका मारावा, किमान त्यामुळे तरी कल्याण-शीळ मार्गावरचे खड्डे भरले जातील, असं उपरोधिक आवाहन मनसे आमदार राजू पाटील यांनी केलं होतं.
“उद्धव ठाकरे ठाण्यात येणार म्हणून त्यांच्या मार्गातील रस्ते खड्डेमुक्त केले. माझी विनंती आहे की आपण डोंबिवलीत पण सहज एक फेरफटका मारावा, किमान कल्याण-शीळ रोडवरचे खड्डे तरी भरले जातील. पाहिजे तर मी स्वत: शिळफाट्यावर स्वागतासाठी उभा राहतो,” असं ट्विट राजू पाटील यांनी केलं होतं.
@OfficeofUT जी ठाण्यात येणार म्हणून त्यांच्या मार्गातील रस्ते खड्डेमुक्त केले. माझी विनंती आहे की आपण डोंबिवलीत पण सहज एक फेरफटका मारावा, किमान कल्याण-शीळ रोडवरचे खड्डे तरी भरले जातील,पाहिजे तर मी स्वत: शिळफाट्यावर स्वागतासाठी उभा राहतो .@mieknathshinde @CMOMaharashtra pic.twitter.com/FrjkFsHfTy
— Raju Patil (@rajupatilmanase) August 24, 2020
राजू पाटील यांच्या या टीकेला खासदार श्रीकांत शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं. “ट्विटरवर मागणी आणि ट्विटरवर फॉलोअप घेणाऱ्या आमदारांनी प्रत्यक्षात कल्याण शीळ रोडवर फेरफटका मारावा, जेणेकरुन कल्याण शीळ रोडवर कुठे काम सुरु आहे हे कळेल”, असं प्रत्युत्तर शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे (MP Shrikant Shinde) यांनी मनसे आमदार राजू पाटील यांना दिलं.
“रेल्वे सेवा बंद असल्याने कल्याण शीळ रस्त्यावर वाहतुकीचा ताण आहे. वेळ मिळतोय तसा पॅचवर्क, डांबरीकरण, काँक्रीटीकरणाची कामे सुरु आहेत. या रस्त्याचं सहा पदरी रुंदीकरणाचं काम काम सुरु आहे. कोरोना संकट असूनसुद्धा या रस्त्याचं काम बंद पडलं नाही. त्याचबरोबर पाऊसही पडतोय. त्यामुळे खड्डे होत आहेत. मात्र खड्डे बुजवण्याचं काम सुरु असून लवकरात लवकर ते काम पूर्ण होईल”, असं स्पष्टीकरण श्रीकांत शिंदे यांनी दिलं.
श्रीकांत शिंदे यांच्या प्रतिक्रियेनंतर मनसे आमदार राजू पाटील थेट शिंदे यांच्या डोंबिवलीतील बंगल्याबाहेर दाखल झाले. तिथे त्यांनी त्यांच्या बंगल्याबाहेरील खड्डा दाखवला. याशिवाय राजकारण न करता खड्डे बुजवण्याचं काम करा, असा सल्ला राजू पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना श्रीकांत शिंदे यांना दिला.
संबंधित बातम्या :
उद्धव ठाकरेंनी डोंबिवलीत सहज फेरफटका मारावा, म्हणजे खड्डे भरले जातील, मनसेचा टोला