मुंबई : गेल्या दोन-तीन महिन्यांपासून, विशेषत: गेल्या महिन्यापासून महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक उलथापालथी पाहायला मिळाल्या. निवडणुकीपूर्वीचा प्रचार ते सत्तानाट्यापर्यंत उमेदवार, आमदार ते राजकीय पक्ष आणि नेते सर्वजण 24 तास व्यस्त पाहायला मिळाले. तहान-भूक हरवून घेतलेली मेहनत निवडणूक निकालाच्या निमित्ताने फळाला आली. आता सत्तास्थापन झाल्यानंतर आमदार काहीसे रिलॅक्स दिसत आहेत. (MLA Rohit Pawar and Dr. Vishwajeet Kadam at toy shop)
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आणि काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांचा खेळण्याच्या दुकानातील एक फोटो समोर आला आहे. दोघेही एकाच गाडीतून जात असताना त्यांना खेळण्याचं दुकान दिसलं आणि आमदारांमधील बाप जागा झाला.
निवडणुकीच्या धामधुमीत कुटुंबाला वेळ देऊ न शकणाऱ्या या आमदारांनी स्वत:च्या मुलांच्या चेहऱ्यावर हसू फुलावं, यासाठी त्यांना खेळणी खरेदी केली. आमदार रोहित पवार यांनी आपल्या फेसबुक पेजवर आमदार विश्वजीत कदम यांच्यासोबत खेळण्याच्या दुकानातील फोटो शेअर केला आहे. रोहित पवार यांनी सर्व प्रसंगाचंही वर्णन केलं आहे.
रोहित पवार आपल्या फेसबुक पेजवर म्हणतात, “कालच्या अधिवेशनाचे कामकाज संपवून याच घडामोडींवर चर्चा करत मी आणि आमदार डॉ.विश्वजित कदम गाडीने एकत्र निघालो होतो, साहजिकच गप्पा राजकीय रंगल्या होत्या पण अचानक रस्त्याच्या बाजूला एक खेळण्याचं दुकान दिसल्याबरोबर दोघांनाही त्या ठिकाणी जाण्याचा मोह आवरला नाही. कारण मुंबईत या सर्व गोष्टी घडत आहेत, आमदार म्हणून यात भाग घेऊन आम्ही आमचं कर्तव्य पार पाडत आहोत पण याकाळात आपल्या घराची विशेषतः आपल्या मुलांची आठवण देखील येत असते. राजकारणात काम करणे म्हणजे एका मोठ्या कुटुंबात वावरल्याचा अनुभव असतो, आपला मतदारसंघच आपलं कुटुंब बनत आणि त्यांच्यासाठी आम्ही आनंदाने काम देखील करत असतो परंतु कधी कधी या जबाबदारीत घराकडे थोडं दुर्लक्ष होत, एक बाप म्हणून जेवढा वेळ आपल्या मुलांना दिला पाहिजे तेवढा देऊ शकत नाही त्यामुळे या क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकानेच अशा छोट्या छोट्या प्रसंगातून नेहमीच आनंद शोधायचा प्रयत्न केला पाहिजे.
आता घरी पोहचल्यानंतर मला भेटल्यानंतर आणि त्यांच्यासाठी घेतलेली खेळणी हातात बघून माझ्या मुलांच्या चेहऱ्यावर जो आनंद असेल तो माझ्यासाठी खूप समाधानकारक असेल”. (MLA Rohit Pawar and Dr. Vishwajeet Kadam at toy shop)