मुंबईः शिवसेनेतील दिग्गज नेते सोडून गेल्यावर शिवसेनेनं मोठ्या प्रमाणावर पक्षसंघटनाचं काम हाती घेतलं आहे. ठिकठिकाणी शिवसेनेच्या (Shivsena) वतीने मेळावे आयोजित केले जात आहे. मातोश्रीवरही (Matoshri) शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठका होत आहेत. एवढे दिवस उद्धव ठाकरे आणि मातोश्रीचे दरवाजे शिवसैनिकांसाठी बंद होते, असा आरोप शिंदे गटातील आमदारांकडून करण्यात येत आहे. मात्र आता एवढे नेते गमावल्यानंतर मातोश्रीवरील दरवाजे शिवसैनिकांसाठी खुले झाले मात्र त्याला उशीर झाला आहे, अशीही चर्चा आहे. यावर शिवसेनेतील माजी मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईत टीव्ही 9 च्या प्रतिनिधींशी बोलतांना त्यांनी शिवसेना पक्ष, पक्षाचं चिन्ह, एकनाथ शिंदेंचा दावा या सगळ्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी मत व्यक्त केलं.
या प्रश्नाचं उत्तर देताना उदय सामंत म्हणाले, मातोश्रीचे दरवाजे आताच का उघडले आहेत, यावर मी काही बोलणार नाही. कारण शिवसेना आमदारांच्या भावना मी स्वतः ऐकून घेतल्या आहेत. शिवसैनिकांना भेटायला मिळतंय, हे एका दृष्टीने चांगलं आहे. मला असं वाटतंय की शिंदे साहेबांनी निर्णय घेतला, तो सगळ्यांसाठी चांगल आहे. आता मातोश्रींचे दरवाजे उघडले काय किंवा नाही उघडले का? याच्यावर बोलण्याचा मला अधिकार नाही. कारण यावर उद्या पुन्हा प्रेस कॉन्फरन्स होऊ शकते. उदय सामंतला शिवसेना तरी कळलीय का? मला शिवसेना कळली नाही. बाळासाहेब नक्की कळले होते. उद्धव ठाकरे कळले आहेत. आणि शिवसेना वाचवण्यासाठी एकनाथ शिंदेंनी जो निर्णय घेतलाय, तो कळलाय.
एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर दावा ठोकणार असून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं हे चिन्ह गमावण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावर बोलताना उदय सामंत म्हणाले, मलाही या गोष्टीबाबत संभ्रम आहे. शिवसेना किंवा पक्षाचं धनुष्यबाण चिन्ह माझं आहे, असं एकनाथ शिंदे कधीच म्हणाले नाहीयेत. उद्धव ठाकरेंच्या भोवतालच्या लोकांनीच हे गैरसमज पसरवले आहेत. मात्र एकनाथ शिंदे यांनी असं वक्तव्य कुठेही केलेलं नाहीये. याउलट शिवसेना बळकट करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत.
एकनाथ शिंदे यांच्या गटात अगदी शेवटी शेवटी उदय सामंत शामिल झाले. याबद्दल बोलताना उदय सामंत म्हणाले, ‘ मला इथे असताना शेवटपर्यंत असंच वाटलं होतं की, एकनाथ शिंदे वापस यावेत. पण शिंदे यांच्या गटात शामिल झाल्यावर एकनाथ शिंदेंची भूमिका लक्षात आली. शिवसेनेची भूमिका बाळासाहेबांनी सांगितली होती. शिवसेनेला बाजूला करण्याचा डाव काही लोकांनी आखला होता. एकनाथ सिंदेंनी उठाव केला आम्ही त्याला समर्थन दिलं. साहेबांपासून लांब जाण्याची प्रक्रिया जोडण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आम्ही ४० लोकांनी जो निर्णय घेतलाय, तो शिवसेना बळकट करण्यासाठी घेतला आहे. शिंदेंनीही अनेकदा हेच सांगितलंय. मला जी काही शिवसेना कळली, ते कुठं तरी दूर करण्याचा प्रयत्न घटकपक्षांकडून सुरु होता. त्यामुळे या उठावात आम्ही शामिल झालो.