महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची 17 नोव्हेंबरला शिवाजी पार्क मैदानावर सभा होणार का? हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. सध्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार अखेरच्या टप्प्यात आहे. 18 नोव्हेंबर प्रचाराचा अखेरचा दिवस आहे. त्यामुळे 17 नोव्हेंबरच्या संध्याकाळची सभा महत्त्वाची होती. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वांद्रे MIG क्लब येथे पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करताना ही सभा होणार की, नाही? या विषयी माहिती दिली आहे. “माझी 17 तारखेला शिवाजी पार्कवरची सभा आहे, पण ती आता होती म्हणावी लागेल. करण त्यासाठी सरकारकडून जी परवानगी मिळणं आवश्यक असतं, ती अजून मिळालेली नाही. फक्त दीड दिवस सभेसाठी उरला आहे. त्यात सभा करणं कठिण झालं आहे. त्यामुळे 17 नोव्हेंबरची सभा रद्द करत आहोत” असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितलं.
“सभेला परवानगी मिळाली नाही हे सत्य आहे. राजकारण आहे की नाही माहीत नाही. जे उमेदवार कामाला लागले आहेत. त्यांचा दिवस निघून जातो. नियोजन करण्यासाठी संधी मिळाली असती तर नियोजन करणं सोपं जातं. दीड दिवसात आता शक्य नाही. दुसऱ्या दिवशी पाच वाजता प्रचार संपतोय. मलाही वेळ मिळेल. उमेदवारांनाही वेळ मिळेल” असं राज ठाकरे म्हणाले. महाराष्ट्रात विधानसभेच्या सर्वच्या सर्व 288 जागांसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होईल.
’17 नोव्हेंबरला मैदान आम्हालाच मिळालं पाहिजे’
17 नोव्हेंबरला आपल्याला मैदान मिळावं, असा उद्धव ठाकरे गटाकडून दावा करण्यात येत होता. कारण 17 नोव्हेंबरला दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतीदिन आहे. त्या निमित्ताने राज्यासह, देशाच्या कानाकोपऱ्यातून बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी लोक शिवाजी पार्कवर येत असतात. “17 नोव्हेंबरला मैदान आम्हालाच मिळालं पाहिजे. कारण बाळासाहेबांचा स्मृतीदिन असल्याने देशभरातून लोक येणार. बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या कोणाला अडवलं, तर परिस्थिती बिघडू शकते” असं संजय राऊत म्हणाले होते.