Marathi News Politics Mns chief raj thackeray and ncp mp dr amol kolhe meeting in mumbai
अमोल कोल्हे ‘कृष्णकुंज’वर जाणार, ‘राज’भेटीत ‘या’ पाच मुद्द्यांवर चर्चेची शक्यता
डॉ. अमोल कोल्हे हे राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार आहेत, तर राज ठाकरे हे मनसेचे अध्यक्ष आहेत.
Follow us on
मुंबई : प्रसिद्ध अभिनेते आणि राष्ट्रवादीचे शिरुरमधील विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे आज ‘कृष्णकुंज’वर जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. आज सकाळी 11.30 वाजता ही भेट होणार आहे. लोकसभा निवडणुकीत डॉ. अमोल कोल्हे यांनी दमदार कामगिरी केली. सलग तीनवेळा खासदार असलेल्या शिवसेनेच्या शिवाजीराव आढळराव पाटलांना पराभूत करुन, डॉ. अमोल कोल्हे हे ‘जायंट किलर’ ठरले.
डॉ. अमोल कोल्हे हे राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार आहेत, तर राज ठाकरे हे मनसेचे अध्यक्ष आहेत. दोघांचेही पक्ष वेगळे असले तरी ‘मराठी’च्या मुद्द्यावर दोघेजण समान मुद्द्यावर एकत्र येणारे नेते आहेत. शिवाय, दोघांनाही महाराष्ट्रात आपलं स्वंतंत्र असं वलय आहे. त्यामुळे या दोघांच्या भेटीकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
‘राज’भेटीत कुठल्या मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते?
लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर डॉ. अमोल कोल्हे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विविध गड-किल्ल्यांना भेटी दिल्या. त्या पार्श्वभूमीवर अमोल कोल्हे हे राज ठाकरे यांच्याशी गड-किल्ल्यांच्या संवर्धनावर चर्चा करु शकतात.
राज ठाकरे हे मराठीच्या मुद्द्यावर लढणारे नेते आहेत. त्याचवेळी, अमोल कोल्हे हे सुद्धा मराठी लोकांमध्ये लोकप्रिय आहे. आधी छत्रपती शिवाजी महाराज आणि आता छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका अमोल कोल्हे मालिकांमधून करत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात त्यांच्या व्यक्तिमत्वाबाबत एक कुतुहल, वलय आहे. त्यामुळे हे दोन्ही नेते मराठीच्या मुद्द्यावरही चर्चा करु शकतात.
मनसेने लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभे केले नव्हते. मात्र, राज ठाकरे यांनी ‘मोदी-शाह मुक्त भारत’ अशी घोषणा देत राज्यभर 10 सभा घेतल्या. यातील एक सभा पुण्यातील खडकवासला येथे झाली. म्हणजेच, खडकवासल्यातून अमोल कोल्हेंचा शिरुर मतदारसंघही जवळ आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या सभेचा अमोल कोल्हेंनाही फायदा झाल्याचे बोलले जाते. त्या पार्श्वभूमीवर अमोल कोल्हे हे राज ठाकरेंचे आभार मानन्यासाठीही भेटू शकतात.
सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, काही महिन्यांवर महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. त्यात राज ठाकरे यांच्या मनसे पक्षाला काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसोबत घेण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. विशेषत: राष्ट्रवादीकडून मनसेला घेण्यासाठी अधिक प्रयत्न होताना दिसतात. त्यात अमोल कोल्हे हेही राष्ट्रवादीचे खासदार आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून अशी काही चर्चा होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.
डॉ. अमोल कोल्हे हे अभिनय क्षेत्रातही काम करत असतात. सध्या त्यांची छत्रपती संभाजी महाराजांवरील मालिका सुरु आहे. त्यामुळे मालिका, सिनेमा किंवा नाट्य क्षेत्राशी संबंधित मुद्द्यांवरही अमोल कोल्हे खासदार म्हणून महत्त्वाची भूमिका घेऊ शकतात. दुसरीकडे, राज ठाकरे हेही वेळोवेळी मराठी कला क्षेत्रासाठी धावून येत असतात. त्यामुळे कला क्षेत्राबाबत आत्मियता बाळूगन असलेल्या या दोन्ही नेत्यांची यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, राज ठाकरे आणि अमोल कोल्हे यांच्या भेटीचा विषय अद्या कळू शकला नाही. ‘राज ठाकरेंची सदिच्छ भेट घेतली’ या नेहमीच्या राजकीय प्रतिक्रियेपलिकडे अमोल कोल्हे माध्यमांना काही महिती देतात का, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. कारण अमोल कोल्हे हे आता केवळ अभिनेते राहिले नसून, ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार आहेत. त्यामुळे अर्थात राजकीय वर्तुळाचं लक्ष या भेटीकडे लागलं आहे.