डोंबिवली : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज कल्याण, डोंबिवलीच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. “येणाऱ्या लोकसभा आणि पुढे विधानसभा निवडणुकीची चाचपणी करण्यासाठी म्हणून मुंबईत बैठका झाल्या. शाखाध्यक्षांच्या बैठका आता चालू केल्यात. मुंबई-ठाण्यात बैठका झाल्या. आता पुन्हा बैठका होतील. चाचपणी सुरु आहे” असं राज ठाकरे म्हणाले. मनसे महायुतीत सहभागी होणार का? मनसेचे नेते महायुतीच्या व्यासपीठावर दिसतात असा प्रश्न एका पत्रकाराने राज ठाकरे यांना विचारला.
‘व्यासपाठीवर दिसले, तिथे पाहिलं म्हणून युत्या-आघाड्या होत नसतात’ असं राज ठाकरे यांनी रोखठोक उत्तर दिलं. त्यांनी महायुतीमध्ये सहभागी होण्याची शक्यता फेटाळून लावली नाही. शरद पवार यांच्या पक्षाला तुतारी निवडणूक चिन्हा मिळालय, त्यावर विचारलेल्या प्रश्नावर राज ठाकरे म्हणाले की, ‘शरद पवारांना तुतारी चिन्ह मिळालय, त्यांनी ते फुंकाव, मी काय सांगू?’
वठणीवर आणलं, तरच चित्र बदलेल
“2019 नंतर महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झालाय. आजच्या राजकारणाकडे आपण बघतोय. पण जे भविष्यात राजकारणात येऊ इच्छितात, त्यांच्यासमोरच राजकारण काय आहे? वाहिन्यांवर लोक येऊन बोलतात, त्यांची भाषा कशी असते? शिव्या देतात, राजकारण्याची येण्याची इच्छा असलेल्या नवीन वर्गाला काय वाटेल? हेच राजकारण आहे. या अशा राजकारणाचा निर्णय महाराष्ट्राच्या जनतेने घेणं गरजेच आहे. त्यांनी वठणीवर आणलं, तरच चित्र बदलेल” असं राज ठाकरे म्हणाले.
‘मी आधी बोलतो, मग पटत तुम्हाला’
“मी आधी बोलतो, मग पटत तुम्हाला. मराठा आरक्षणाबद्दल मी हेच बोललेलो. काय झालं शेवटी?. माझ्या गोष्टी कालांतराने पटतात. जगभरात मतदान शिक्क्यावर होतं असेल, तर आपण व्होटिंग मशीन का घेऊन बसलोय? मी मतदान केल्यानंतर ते त्याच उमेदवाराला मिळालय का? हे समजत नाही” असं म्हणत राज ठाकरे यांनी व्होटिंग मशीनला विरोध दर्शवला. महत्त्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यासाठी जातीच राजकारण केलं जातय असही ते म्हणाले.