लोकसभा निवडणुकीच्यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पंतप्रधानपदासाठी मोदींना पाठिंबा दिलेला. पर्यायाने भाजपा, महायुतीच समर्थन केलं होतं. महाराष्ट्रात मनसे कार्यकर्त्यांनी महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार केला होता. राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात महायुतीच्या उमेदवारांसाठी सभा घेतल्या होत्या. लोकसभेनंतर आता विधानसभेला मनसे महायुतीमध्ये सहभागी होणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. त्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जालना येथील पत्रकार परिषदेत सूचक उत्तर दिलं. ‘महायुतीत तिघांचे स्टेक आहेत, चौथा पार्ट्नर कुठून घेणार?’ असा सवाल करत विधानसभेला एकला चलो रे चे संकेत दिले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा सध्या महाराष्ट्र दौरा सुरु आहे. त्यांनी काही विधानसभा मतदारसंघात उमेदवार सुद्धा जाहीर केले आहेत.
राज ठाकरे यांचा पुढचा दौरा विदर्भाचा आहे. त्यात कशी विघ्न आणतात पाहू असं राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरे यांनी आज उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर थेट निशाणा साधला. मनोज जरांगे पाटील यांच्याआडून हे दोन्ही नेते राजकारण करत असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला. संजय राऊत यांच्यावर सुद्धा राज ठाकरेंनी अत्यंत बोचरी टीका केली. संजय राऊत शरद पवारांच्या उंबरठ्यावर बसून आयुष्य झिजवणार. संजय राऊत शरद पवारांची सोंगटी आणि करवली आहे अशा शब्दात राज ठाकरेंनी टीका केली.
अजित पवारांबद्दल काय म्हणाले राज ठाकरे?
अजित पवारांबद्दलही राज ठाकरे एक गोष्ट स्पष्टपणे बोलले. “अजित पवार कधी जातीच्या राजकारणात पडले नाहीत. अजित पवारांनी कधी जातीवर भाष्य केलं नाही” असं ते म्हणाले. “भाजपच्या चार पाच लोकांनी संविधान बदलणार सांगितलं. काही मूर्ख असतात. पण ती गोष्ट भाजपला हे खोडता आली नाही. शिवाजी पार्कच्या भाषणात मी म्हटलं होतं संविधान बदलणार नाही हे स्पष्ट करा. पण त्यांना खोडता आलं नाही. “मराठा आरक्षणाला राज ठाकरेंचा विरोध ही बातमी पत्रकारांनी लावली. राज ठाकरे विरुद्ध मराठा समाज या बातम्या कुणी लावल्या. इथून सुरू झालं. ते उघड झालं. मला एका गोष्टीचं समाधान आहे, यांचं नेमकं काय चाललंय हे किमान उघड झालं. याच्यापुढे ते काय करणार आहेत हे आता लोकांना कळेल” असं राज ठाकरे म्हणाले.