“माझ्या दौऱ्यात जरांगे पाटलांचा काहीच संबंध नव्हता. त्यांचा विषयही नाही. त्यांच्या आंदोलनामागून शरद पवार आणि उद्धव ठाकरे सारखी मंडळी ज्या प्रकारचं राजकारण करत आहेत, ते मला मराठवाड्यात दिसतंय. यातील दुर्देवाचा भाग म्हणजे काही पत्रकार या गोष्टीत इन्व्हॉल्व झाले आहेत. मला त्यांची नावेही माहीत आहेत. योग्य ठिकाणी जातील आणि चौकशी होईल” असं राज ठाकरे म्हणाले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. “कुणाला पेव्हर ब्लॉकची कामे मिळाली, कुणाला एमआयडीसीत जागा मिळाली. कुणाला किती पैसे मिळाले आणि त्यातून कशा गाड्या घेतल्या गेल्या. अशा सर्व गोष्टी माझ्या कानावर आल्या आहेत. मी जेव्हा धाराशीवला होतो. तेव्हा धाराशीवला काही लोक भेटायला आले. त्यांना भडकवण्याचं काम काही पत्रकार करत होते. मी त्यांना सांगितलं तुम्ही या, तेव्हा तुम्ही खाली जा असं सांगणारे पत्रकार होते. माझ्यासोबत कोण येणार इथपर्यंत प्रकरण झालं” असं राज ठाकरे म्हणाले.
“त्यातील दोन पत्रकार होते ते पूर्वीचे शरद पवार यांच्या जवळचे आहेत असं म्हणतात. त्यांचे फोटोही आहेत, तुतारी बरोबर पूर्वीचे फोटो कसे असतील हे मला कळलं नाही. उद्धव ठाकरे गटाचे आणखी दोन जण होते. परवा दिवशी नांदेडमध्ये असताना सर्किट हाऊसवर दोनजण ओरडत होते. त्यातील एक जणाचा शरद पवारांसोबतचा आताचा फोटो आहे. काल जे झालं. त्यात एक शिवसेनेचा जिल्हा प्रमुखच होता” असं राज ठाकरे म्हणाले.
‘त्यांच्या प्रेमाखातर मतदान झालं नाही’
“या सर्व गोष्टींशी, लोकसभेचा निर्णय लागला. यांना वाटलं मराठवाड्यात मतदान झालं. पवार आणि उद्धव ठाकरे यांनी समजावून घेतलं पाहिजे की, ते मतदान मोदी आणि शाह यांच्या विरोधातील होतं. त्यांच्या प्रेमाखातरचं मतदान नव्हतं. मी नेहमी सांगत आलो. विरोधी पक्ष कधी जिंकत नसतो. सत्ताधारी हरत असतो. त्यांना अँटी व्होट मिळाली” असं राज ठाकरे म्हणाले. “मुस्लिम आणि दलितांनी देशभर मोदी विरोधात मतदान केलं. संविधान बदलणार हे भाजपचाच माणूस बोलला होता ना. इतर कुणी नरेटिव्ह केलेले नव्हते. पण लोकं भडकले होते. त्यांनी मतदान केलं. पण ठाकरे-पवारांना वाटतं त्यांच्या प्रेमाखातर मतदान झालं. पण त्यांच्या प्रेमाखातर मतदान झालं नाही. त्यांना वाटतं विधानसभेला अशीच खेळी खेळावी” असं राज ठाकरे म्हणाले.
‘शिवसेना जिल्हाप्रमुखाला आमच्या पोरांनी मार मार मारलं’
“काल शिवसेनेचा जिल्हाप्रमुख त्याला आमच्या पोरांनी मार मार मारलं. नशिब पोलीसमध्ये पडले. तो ओरडत होता एक मराठा लाख मराठा, म्हणजे काय. त्यांना दाखवायचं की हे जरांगे पाटलांचे माणसं आहेत. यांच्याआडून यांचं विधानसभेचं राजकारण सुरू आहे. हे लोकांसमोर आलं पाहिजे. सर्वांनी ही गोष्ट समजून घेतली पाहिजे. शरद पवारांसारखा ८२-८३ वर्षाचा माणूस स्टेटमेंट करतोय की महाराष्ट्राचा मणिपूर होईलय म्हणजे या लोकांनी मणिपूर होईल यासाठी चिंता वाहिली पाहिजे ते म्हणतात मणिपूर होईल यांच्या डोक्यात काय चालू आहे हे लक्षात घ्या” असं राज ठाकरे म्हणाले.