राळेगणसिद्धी : या (सत्ताधारी) नालायकांसाठी जीवाची बाजी लावू नका, असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट सत्ताधाऱ्यावर घणाघात केला आहे. राज ठाकरे यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची अहमदनगर येथील राळेगणसिद्धी येथे जाऊन भेट घेतली. काही मिनिटं बंद दाराआड चर्चा केल्यानंतर राज ठाकरे उपोषणस्थळी उपस्थित असलेल्यांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी नरेंद्र मोदींसह केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.
राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
“या नालायकांसाठी जीवाची बाजी लावू नका. हे सर्व खोटारडे आहेत. नरेंद्र मोदी या माणसावर विश्वास ठेवू नका. अण्णांच्या आदोलनामुळेच नरेंद्र मोदी हे सत्तेत आले आहेत. हेच भाजपवाले लोकपाल बिलावरुन काँग्रेसला शिव्या घालत होते.” अशा शब्दात राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्यासह भाजप सरकारचा समाचार घेतला.
यावेळी राज ठाकरे यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले, “इथे खरंतर अरविंद केजरीवाल यायला हवे होते. अण्णांमुळे त्यांना दिल्लीत सत्ता मिळाली आहे. नाहीतर कोण केजरीवाल होते?”
हे वाचाच, भारतीय म्हणून तुम्हालाही अण्णा हजारेंचा अभिमान वाटेल!
अण्णांना सांगितलं, गाडून टाकू सर्वांना, असे राज ठाकरेंनी म्हणताच उपस्थितांमधून एकच जयघोष सुरु झाला. यावेळी राज ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाठिंबा अण्णांना जाहीर केला.
राज ठाकरेंच्या भाषणाचा व्हिडीओ :
गेल्या सहा दिवसांपासून अण्णांचं आंदोलन
केंद्रात लोकपाल नियुक्त करावा, या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपोषण सुरु केले असून, आज या उपोषणाचा सहावा दिवस आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याची ठाम भूमिका अण्णांनी घेतली आहे. शिवाय, जर मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर येत्या 8 किंवा 9 फेब्रुवारीला ‘पद्मभूषण’ पुरस्कार परत करेन, असा इशाराही अण्णांनी दिला आहे.