मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना आज मनसे नेते बाळा नादंगावकर यांनी बाबरी मशिदीची एक वीट भेट म्हणून दिली. ही भेट स्वीकारल्यानंतर राज ठाकरे यांनी उपस्थित पत्रकारांशी संवाद साधला. “6 डिसेंबरला बाबरीचा ढाचा पडला, त्यावेळी महाराष्ट्रातून जे शिवसैनिक तिथे गेले होते, त्यात बाळा नांदगावकर होते. ढाचा पडल्यानंतर तिथे ज्या वीटा होत्या, त्यातल्या दोन वीटा बाळा नांदगावकर घेऊन आले होते. एक वीट त्यांच्याकडे आहे, आज दुसरी वीट त्यांनी भेट म्हणून दिलीय” असं राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरे हे आपल्या मिश्किल स्वभावासाठी ओळखले जातात. त्यांनी तिथे उपस्थित पत्रकारांना सुद्घा हसवलं.
वीटेच वजन बघा, त्यावेळच बांधकाम खूप चांगल्या दर्जाच होतं, हे म्हणताना त्यांनी पत्रकारांना हे बांधकाम का चांगलं होत म्हणून प्रश्न विचारायला सांगितला. पत्रकारांनी सुद्धा त्यांना का चांगलं होतं? असा प्रश्न केला. त्यावर राज ठाकरे एवढच म्हणाले, ‘त्यावेळी कंस्ट्रक्शनसाठी टेंडर्स नाही निघायचे’ राज यांनी एवढ म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हंशा पिकला.
‘ती वीट सुद्धा लवकरच मिळवीन’
बाळासाहेब असते, तर ही वीट घेताना त्यांना आनंद झाला असता, असं राज ठाकरे म्हणाले. “ही वीट म्हणजे ढाचा पाडल्याचा पुरावा आहे. आता मला अशीच राम मंदिराची एक वीट हवी आहे. मंदिराच बांधकाम अजून सुरु आहे, त्याची सुद्धा एक वीट मी लवकरच मिळवीन” असं राज ठाकरे म्हणाले.
बाळा नांदगावकर काय म्हणाले?
“तो प्रसंग आठवला की फक्त जय श्रीरामच्या घोषणा ऐकू यायच्या. 32 वर्षे झाली. त्यावेळी काय सुचलं माहिती नाही पण, मी वीट आणली. मी माझगावमध्ये कार्यालय बांधलं, तेव्हा त्या कर्यालयाखली वीट घातली होती. आता ते कार्यालय यशवंत जाधवांकडे आहे. असो हरकत नाही, तो माझा जुना सहकारी आहे” असं बाळा नांदगावकर म्हणाले.