मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या प्रचारासाठी 9 सभा घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. उत्तर मुंबईतील काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर, साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले, बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह 9 उमेदवारांसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे प्रचाराच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.
कुणासाठी राज ठाकरे प्रचारसभा घेऊ शकतात?
येत्या 12 एप्रिलपासून राज ठाकरे प्रचाराच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती मिळते आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांसाठी जरी राज ठाकरे सभा घेणार असले, तरी उमेदवारांच्या व्यासपीठांवर न जाता, राज ठाकरे स्वतंत्र सभा घेणार असल्याची माहिती आहे.
राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यंदाची लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. राज ठाकरे यांनी मनसेच्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यात यासंबंधी अधिकृत घोषणा केली. मात्र, केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील फडणवीस सरकार यांच्याविरोधात राज्यभर प्रचारसभा घेणार असल्याचेही राज ठाकरे म्हणाले होते. मात्र, उमेदवार उभे केले नसताना, राज ठाकरे कुणासाठी प्रचार करणार, असा प्रश्न विचारला जात होता. अखेर आघाडीच्या उमेदवारांसाठी राज ठाकरे सभा घेणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.
6 एप्रिल रोजी गुढी पाडव्यानिमित्त मुंबईतईल शिवाजी पार्कवर राज ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेत राज ठाकरे आपली भूमिका जाहीर करु शकतात. प्रचारासाठी आघाडीच्या व्यासपीठावर जाणार की स्वतंत्ररित्या मोदी-भाजपविरोधात सभा आयोजित करणार, हे उद्या स्वत: राज ठाकरे स्पष्ट करण्याची शक्यता आहे.
याआधीही राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. राज ठाकरेंच्या गुढी पाडव्याच्या सभेला स्वत: शरद पवार हजर राहतील, अशीही चर्चा राज ठाकरे आणि शरद पवार यांच्या भेटीनंतर सुरु झाली होती. मात्र, त्या चर्चांना कुठलाही दुजोरा मिळाला नाही. आता राज ठाकरे आघाडीच्या प्रचारासाठी सभा घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.