भाजपाच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज शिवतीर्थवर येऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. येत्या 17 मे रोजी शिवाजी पार्क मैदानात महायुतीची भव्य सभा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या सभेसाठी येत आहेत. महायुतीच्या या सभेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित रहावं, यासाठी चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. राज ठाकरे यांनी महायुतीच्या सभेच निमंत्रण स्वीकारल्याची माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. राज्यात आतापर्यंत चार टप्पे पार पडले आहेत, यात राज ठाकरे यांचा महत्त्वाचा वाटा होता. मुंबईत आल्यावर त्यांचे आभार मानणं आवश्यक होतं, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
“मुंबईत, नाशिकमध्ये निवडणुका आहेत, त्यात राज ठाकरे यांची महत्त्वाची भूमिका राहील. त्यांनी पुण्यात आवाहन केलं, त्याचा महायुतीला फायदा झाला” असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे महायुतीला बळ मिळालं. पुढच्या काळातही महायुतीला बळ मिळेल अशी अपेक्षा आहे. “राज ठाकरे 17 तारखेला महायुतीच्या सभेत भूमिका मांडतील. त्यांना आम्ही विनंती केलीय की, त्यांनी अजून जास्त वेळ द्यावा. 18 तारीख सुद्धा आहे, त्यामुळे महायुतीच्या उमेदवारांना बळ मिळेल” असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. म्हणजे 17 तारखेनंतरही राज ठाकरेंनी महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करावा, अशी भाजपाने विनंती केलीय.
200 जागाही मिळणार नाहीत, या काँग्रेसच्या दाव्यावर बावनकुळेंच काय म्हणण?
चंद्रशेखर बावनकुळे यांना यावेळी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपाला 200 पेक्षा जास्त जागा मिळणार नाही, हा दावा केलाय, त्या बद्दल विचारण्यात आलं. “काँग्रेस विरोधी पक्ष नेता सुद्धा बसवू शकणार नाही. काँग्रेस पक्ष 240 जागांवर लढतोय, ते पंतप्रधानपदाचा विचार कसा करु शकतात. काँग्रेस विरोधी पक्षनेता बसवण्याच्या स्थितीत सुद्धा राहणार नाही” असा दावा बावनकुळेंनी केला.
होर्डिंग कोसळलं त्याच घाटकोपरमध्ये मोदींचा रोड शो
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो होर्डिंग कोसळलं, त्या घाटकोपरमध्ये होणार आहे, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला, त्यावर त्यांनी “सरकार म्हणून जे करणं गरजेच आहे, ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा करत आहेत. पंतप्रधान मोदींची रॅली ही आधीपासूनच ठरली होती. आम्हाला सर्वांना संवेदना आहेत, त्या आम्ही व्यक्त केल्यात” असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.