मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातं एक मोठं नाव आगामी काळात चित्रपट निर्मिती आणि वृत्तपत्र क्षेत्रात येऊ शकतं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे महाराष्ट्रातील सर्वात ताकदवान नेत्यांपैकी एक नेते आहेत. त्यांची राज्यात आजच्या घडीला सत्ता नसली तरी त्यांचा फॅन फॉलोविंग अफाट आहे. महाराष्ट्रातील हजारो तरुण आजही राज ठाकरे यांच्यावर प्रचंड प्रेम करतात. राज ठाकरे यांनी केलेली भाषणं, त्यांनी आपल्या भाषणादरम्यान व्हिडीओ-ऑडिओच्या माध्यमातून मांडलेली जनतेची व्यथा, ब्लू प्रिंट या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर राज ठाकरे यांचं महाराष्ट्रासाठी असणारं व्हिजन जनतेनं पाहिलं आहे. राज ठाकरे हे जनतेचा आवाज आहेत, असं त्यांच्या कार्यकर्त्यांकडून सांगितलं जातं. विशेष म्हणजे हाच जनतेचा आवाज आगामी काळात चित्रपट आणि वृत्तपत्राच्या माध्यमातून आणखी बुलंद होण्याची शक्यता आहे. कारण राज ठाकरे यांनी आज एका मुलाखतीत याबाबतचं विधान केलं आहे.
“मला स्वतःच वर्तनमान पत्र काढायचं होतं. मात्र जाहिरातीवर सर्व अवलंबून असतं”, अशी उद्विग्नता राज ठाकरे यांनी व्यक्त केली. पण मला वर्तमान पत्र काढायचं आहे, असं राज ठाकरे ठामपणे म्हणाले. यावेळी राज ठाकरे यांनी आपल्यासोबत पाहिलेल्या एका चित्रपटाचा किस्सा सांगितला. त्यानंतर राज ठाकरेंना चित्रपट निर्मिती क्षेत्रात काम करणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राज ठाकरेंनी मी चित्रपट निर्मिती करतो. कथा पटकथा माझी असेल, असं स्पष्ट केलं. यावेळी राज ठाकरे यांना आवडती नटी कोण? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी आपल्याला पहिल्यापासून ते आतापर्यंत हेमा मालिनी ही एकमेव नटी आवडते. तिच्या चेहऱ्यावर पावित्र्य आहे तेवढं कुणाच्या नाही, असं सांगितलं.
तुम्ही व्यंगचित्रकार आणि राजकारण असे का निवडले? संगीत आणि राजकारण असे का नाही निवडले? असा प्रश्न राज ठाकरे यांना यावेळी विचारण्यात आला. त्यावर राज ठाकरेंनी, मला संगीतचा कान आहे. मी खूप ऐकलंय. मी जगभरातील संगीत ऐकतो. माझ्या वडिलांनी माझं नाव स्वराज ठेवलं. माझ्या बहिणीचे नाव जयवंती ठेवलं तो एक संगीतातील राग आहे. पण नंतर त्यांना कळलं की यांच्याकडून काही होणार नाही. जेव्हा बाळासाहेब व्यंगचित्र काढायला बसायचे तेव्हा ऐकून पाहून माझ्यावर खूप संस्कार झाले. आणि ते पुढे करावे असं मला वाटलं आणि मी म्हणून जे जे आर्ट्सला गेलो. मला व्यंगचित्रकार व्हायचे होते. पण त्याचा बाप माझ्याच घरात बसला होता. म्हणून मी कॉलेज सुद्धा सोडले”, असं राज ठाकरे यांनी सांगितलं.
“मी अपघाताने राजकारणात आलो. मला आताचे राजकारण खूप मिसकरेक्ट वाटतं. महाराष्ट्रात असे इतके घाणेरडे राजकारण कधीच पाहिले नाही. त्यामुळे या सगळ्याचा वीट आला आहे. कोणीही काहीही बोलतोय. ज्या महाराष्ट्राने देशाचे प्रबोधन केले त्या महाराष्ट्राला अशी वेळ आली आहे. मागे एकदा पुण्यात माझे व्याख्यान झाले. तेव्हा मला एक हाक ऐकू आली. 1995 च्या अगोदरचा महाराष्ट्र आणि 1995 नंतरचा महाराष्ट्र”, असं राज ठाकरे म्हणाले.
“1995 नंतर भारतात चॅनल इंटरनेट असं सगळं येत गेलं आणि त्यामुळे राजकारण चळवळी अशा अनेक गोष्टींमधून सुशिक्षित वर्ग यातून बाहेर पडला आणि त्यामुळे श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दुवा हरवून गेला. 1995 च्या आधीचा सर्व काळ काढा. कोणतीही राजकीय चळवळ घ्या. त्यात मध्यमवर्गीय आणि सामान्य असाच लोकवर्ग होता. आणि तोच श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दुवा होता”, असंदेखील राज ठाकरे यावेळी म्हणाले.