मुंब्र्यात एका मराठी माणसासोबत दादागिरीची घटना घडली आहे. एका युवकाने फळ विक्रेत्याला मराठीत बोलायला सांगितलं, त्यावरुन या सगळ्या वादाची सुरुवात झाली. फळविक्रेत्याला मराठी का येत नाही? म्हणून विचारलं, त्यावर जमावाने तरुणाला कान पकडून माफी मागायला लावली. आज विशाल गवळी या तरुणाने मनसे नेते अविनाश जाधव यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर मनसे नेते अविनाश जाधव यांनी थेट मुंब्र्यात घुसण्याचा इशारा दिला आहे. “मागच्या काही दिवसात मराठी माणसाच्या बाबतीत अपमानास्पद गोष्टी घडायला लागल्या आहेत. मुंब्र्यातील कालची घटना दुर्भाग्यपूर्ण आहे. तो मुलगा बहिणीसाठी औषध घ्यायला गेला होता. तिथून तो फळ घ्यायला गेला. फळ घेताना 100 रुपये किलो सांगितलं. तो बोलला 50 ला देणार का? तो हिंदीत बोलत होता, हा मुलगा त्याला बोलला, मराठीत बोल महाराष्ट्रात राहतो. त्यातून वाद सुरु झाला” असं अविनाश जाधव यांनी सांगितलं.
“त्यानंतर तिथे असलेल्या मुस्लिम मुलांना समजलं. 100-150 चा जमाव जमला. मला कळत नाही, महाराष्ट्रात मराठीत बोलणार नाही बोलण्याची यांची एवढी हिम्मत कशी होते? त्यांनीच व्हिडिओ रेकॉर्ड करुन व्हायरल केला. हे महाराष्ट्रात असच घडत राहिलं, तर महाराष्ट्रात मराठी माणसाच अस्तित्व विकोपाला जाईल. कल्याण, ठाणे, विरार आणि मुंबईतील जैन माणसाची घटना या सगळ्या घटना पाहिल्या, तर सत्ता परिवर्तनानंतर हिम्मत वाढत चालली आहे” असं अविनाश जाधव म्हणाले.
पोलीस स्टेशनच्या बाहेर काही मुस्लिम मुलं जमली
“मुंब्र्यातील घटनेनंतर उलट पोलिसांनी याच्यावर गुन्हा दाखल केला. याला पोलीस स्टेशनला नेलं. पोलीस स्टेशनच्या बाहेर काही मुस्लिम मुलं जमली. पोलीस स्टेशनच्या आवारात घोषणाबाजी केली. घोषणाबाजी करायची काय गरज होती?. मराठीत बोलायला सांगितलं, म्हणून तुम्ही घोषणाबाजी करणार का? त्या मुलाला आणि त्याच्या आईला चार-चार तास पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवणार” असं अविनाश जाधव म्हणाले.
…तर मराठी माणसाला चौकाचौकात मारलं जाईल
“महाराष्ट्रात मागच्या काही दिवसांपासून सतत मराठी माणसावर हल्ले होत आहेत. भविष्यात यांची हिम्मत अशीच वाढायला लागली, तर मराठी माणसाला चौकाचौकात मारलं जाईल. माझी मराठी माणसाला विनंती आहे, एकत्र या. तुमच्यावर कोणी फटके टाकत नाही, म्हणून लांबून बघणार असाल आणि या सगळ्याकडे कानाडोळा करणार असाल, तर एकदिवस हा प्रसंग प्रत्येक मराठी माणसावर येईल. त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल” असं अविनाश जाधव म्हणाले. ते मराठी कुटुंब भयभयीत आहे, या प्रश्नावर अविनाश जाधव म्हणाले की, “आता मनसे त्यांच्यामागे आहे. त्यांनी आ रे करावं, आम्ही मुंब्र्यात जाऊन का रे करु” असा इशाराच मनसेने दिला आहे.