मुंबई: राज्यातील एकनाथ शिंदे (cm eknath shinde) आणि देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्या सरकारवर खोके सरकार म्हणून ठाकरे गटाकडून वारंवार हल्ला करण्यात येतो. हे सरकार बेकायदेशीर सरकार आहे, अशी टीकाही करण्यात येते. मात्र, दुसरीकडे ठाकरे गटाच्या शिवसेनेचं मुखपत्रं असलेल्या दैनिक सामनात शिंदे-फडणवीस सरकारची जाहिरात छापून आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. या जाहिरातीवरून मनसेने (mns) ठाकरे गटाला चांगलंच घेरलं आहे. खोके सामनामध्ये पोहोचले का? असा सवालच मनसेकडून करण्यात आला आहे.
दैनिक सामनाच्या पहिल्या पानावर ही जाहिरात छापून आली आहे. स्वातंत्र्याची 75 वर्ष… एका वर्षात 75,000 रोजगार देण्याचा महाराष्ट्राचा महासंकल्प. पहिल्या टप्प्यातील नियुक्ती प्रदान करण्याचा राज्यस्तरीय कार्यक्रम, असा या जाहिरातीवर मजकूर लिहिण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी या महासंकल्प कार्यक्रमाला दृकश्राव्य माध्यमातून संबोधित करणार असल्याचा या जाहिरातीत उल्लेख आहे. तसेच प्रमुख उपस्थितांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री दीपक केसरकर, मंगलप्रभात लोढा, रवींद्र चव्हाण, शंभुराज देसाई आणि उदय सामंत यांची नावे आहेत. त्याचबरोबर ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांचंही नाव आहे.
हा कार्यक्रम आज 3 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये होणार असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. या जाहिरातीत सर्वात वरती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो आहे. तर जाहिरातीच्या मध्ये एकनाथ शिंदा आणि देवेंद्र फडणवीस यांचा नियुक्तीपत्रांचं वाटप करतानाचा फोटो आहे.
शिवसेनेच्या फुटीनंतर पहिल्यांदाच शिंदे सरकारची जाहिरात सामनात छापून आल्याने त्यावरून ठाकरे गटावर टीका करण्यात येत आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी या जाहिरातीवरून ठाकरे गटाला टोले लगावले आहेत.
खोके सामनामध्ये पोहोचले का?, असा सवाल संदीप देशपांडे यांनी ट्विट करून केला आहे. सामनाचं खरं स्वरुप लोकांसमोर आलं आहे. आदित्य ठाकरे रोज सांगतात हे अनधिकृत सरकार आहे. मग या अनधिकृत सरकारची अधिकृत जाहिरात सामनात कशी? सर्व तत्त्वे बाजूला करतो आणि पैसे गोळा करतो हेच या जाहिरातीतून सिद्ध होत आहे, अशी टीका संदीप देशपांडे यांनी केली आहे.
शिंदे-फडणवीस सरकार घटनाबाह्य असल्याची आदित्य ठाकरे यांनी वारंवार टीका केली आहे. मात्र त्याच शिंदे-फडणवीस सरकारची जाहिरात सामना प्रसिद्ध झाल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.