मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसबाबत केलेल्या वक्तव्यामुळे निर्माण झालेला वाद आता शिगेला पोहोचला आहे. या वादात दोन्ही बाजूने आरोप-प्रत्यारोप सुरु असताना मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना फटकारले आहे. दीडदमडीच्या लोकांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याविषयी बोलू नये. त्यांची तेवढी लायकीही नाही, अशी टीका संदीप देशपांडे यांनी केली.
संदीप देशपांडे शनिवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीवर आगपाखड केली. राष्ट्रवादी नाव असणारा पक्ष महाराष्ट्रात अतिश्य संकुचित आणि जातीपातीचं राजकारण करत आहे. मनसेला त्यांच्याकडून शिकायची गरज नाही. राज्यात जातीपातीचं विष पेरणारे हे लोक महाराष्ट्रद्रोही असल्याचे संदीप देशपांडे यांनी म्हटले. त्यांच्या या टीकेचा रोख राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांच्या दिशेने होता.
राष्ट्रवादी पक्षावर जातीयवादाचा आरोप कोण करतोय तर ज्यांनी महाराष्ट्रात दक्षिण भारतीय व उत्तर भारतीय हा द्वेष निर्माण करण्याचे महापातक करून “राष्ट्रद्रोह” केला ती व्यक्ती! अपयशी नेत्याला उत्तर देणे म्हणजे घाणीवर दगड फेकून अंगावर घाण उडवून घेणे आहे’, अशा शब्दांत अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांना जोरदार टोला लगावला होता.
स्वातंत्र्याच्या 74 वर्षानंतरही निवडणुकीत भाषणं होतात तेव्हा सगळ्यांकडून सारखं रस्ते, पाणी, विज अशी तिच तिच आश्वासनं दिली जात आहेत. तेव्हा एवढ्या वर्षात आपण काय केलं हे शोधलं पाहिजे. साधारणपणे आपण 99 साल पाहिलं तर त्यापूर्वी महाराष्ट्रात जातीपाती होत्याच. पण 99 नंतर जातीपातींमध्ये द्वेष वाढला, हे माझं वाक्य होतं. राष्ट्रवादीच्या निर्माणानंतर तो वाढला असं मी म्हणालो होतो, असं राज यांनी सांगितले.
आधी प्रत्येकाला स्वत:च्या जातीबद्दल अभिमान होता. पण अन्य जातींबद्दल द्वेष राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर निर्माण झाला, असं मी एकटाच बोललो. मला प्रबोधनकार वाचण्याचा सल्ला देण्यात आला. मी सर्वांची पुस्तकं वाचलेत. प्रबोधनकरांचं संदर्भ त्या त्या काळातले होते. माझ्या आजोबांचं लिखाण आपल्याला हवं तसं घ्यायचं असं चालणार नाही. मी यशवंतरावांचंही वाचलं आहे, त्यांचेही मत काय होतं हेही मला माहिती आहे, असा जोरदार टोला राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला लगावला होता.
संबंधित बातम्या:
शरद पवार भाषणाची सुरुवात शिवाजी महाराजांच्या नावानं का करत नाहीत? राज ठाकरेंचा सवाल