पुणे : पुण्यातील मनसे नगरसेवक वसंत मोरे (Vasant More) हे वेगवेगळ्या कारणांमुळे या वर्षी चर्चेत राहिले. आता त्यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत त्यांनी जबरा ठुमके लगावले आहेत. आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन वसंत मोरे यांनी हा व्हिडीओ (Vasant More Dance Video) शेअर केला आहे. अभिनेत्री अमृता खानविलकर हीच्या चंद्रमुखी सिनेमातील प्रसिद्ध चंद्रा (Chandra Song From Chandramukhi Movie) या गाण्यावरच वसंत मोरे यांना ठेका धरला होता. मिरवणुकीत ट्रॅक्टरवर चढलेल्या वसंत मोरे यांचा नाचतानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियात गाजतोय. अनेकांनी त्यांच्या या व्हिडीओवर दिलखुलास प्रतिक्रिया दिल्या आहेत.
शुक्रवारी वसंत मोरे यांनी हा व्हिडीओ आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन शेअर केला. या व्हिडीओमध्ये लावणी नृत्यात बाण मारतात, त्याप्रमाणे वसंत मोरे यांनी दिलखेचक अदा देत नृत्य केलंय. ट्रॅक्टरवर लावण्यात आलेल्या डीजेवर गणपती मिरवणुकीचा आनंद वसंत मोरे यांनी घेतला. यावेळी त्यांनी आपल्या इतर सहकाऱ्यांसोबत सामान्य कार्यकर्त्याप्रमाणे मनमुराद डान्स केला.
कोरोनानंतर पहिल्यांदाच मोठ्या थाटामाटत होत असलेल्या गणपती विसर्जनाचा शुक्रवारी उत्साह पाहायला मिळाला. दोन वर्षांनी कोणत्याही बंधनाविना गणेशभक्तांनी विसर्जन मिरवणुकीचा आनंद घेतला. यावेळी मिरवणुकीत डीजे, ढोल, यांच्या तालावर गुलालाची उधळण करत गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीचं आयोजन ठिकठिकाणी करण्यात आलं होतं.
पुण्यातही गणपती मिरवणुकीचा आनंद आणि उत्साह यावेळी पाहायला मिळाला. यात पुण्याचे मनसे नगरसेवक आणि नेते वसंत मोरे यांच्या डान्सची सोशल मीडियात आता चर्चा रंगली आहे. ‘बाण नजरेतला घेऊनी अवतरली सुंदरा…’ असं कॅप्शन देत वसंत मोरे यांनी गणपती मिरवणुकीतला व्हिडीओ फेसबुकवरुन शेअर केला आहे. आतापर्यंत 18 हजार पेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ लाईक केलाय. तर अनेकांनी हा व्हिडीओ शेअरही केलाय. डीजेच्या तालावर केलेला वसंत मोरे यांचा हा डान्स सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय.
वसंत मोरे हे राज ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. या वर्षाच्या सुरुवातीला राज ठाकरे यांनी घेतलेल्या मशिदींवरील भोंग्याच्या भूमिकेमुळे वसंत मोरे चर्चेत आले होते. त्यानंतर राजकारणही गाजलं होतं. पण पुण्यात मनसेच्या अंतर्गत गटबाजीचं राजकारणही मधल्या काळात गाजलं होतं. तेव्हादेखील वसंत मोरे हे चर्चेत होते. वसंत मोरे मनसे सोडणार, अशी कुजबूजही सुरु होती. पण आपण कायम मनसैनिक राहणार असल्याचं वसंत मोरे यांनी त्यावेळी स्पष्ट केलं होतं.