मुंबईः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दहीहंडीला खेळाचा दर्जा देत गोविंदांना (Govinda) सरकारी नोकरीत विशेष सवलत देण्याचा निर्णय घेतलाय. असं असेल तर मंगळागौरीला साहसी खेळाचा दर्जा द्या, अशी खिल्ली मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उडवली. राज ठाकरे हे मुंबई येथील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते. दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर राज ठाकरे पुन्हा एकदा राजकारणात खऱ्या अर्थाने सक्रिय झालेले दिसत आहे. राज्यभरातील मनसेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आज मुंबईत आयोजित करण्यात आला होता. मेळाव्याला संबोधित करताना राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे, शिवसेनेसह, शिंदेसेनेला टार्गेट केलं. महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर जनतेनंच बोललं पाहिजे. राज्यकर्ते तमाशा करतायत, पण नागरिकांना त्याची काहीच पडलेली नाही, हे जोपर्यंत चालेल तोपर्यंत महाराष्ट्राचा विकास होणार नाही, अशा शब्दात राज ठाकरे यांनी सुनावलं,
दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्याच्या निर्णयावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, ‘ राजकारण हा गंभीर विषय आहे. या सरकारच्या भाषेत आपण राजकारणाला खेळाचा दर्जा दिला आहे. दहीहंडीलाही दर्जा दिला. आता मंगळागौरला देतील. लग्न झाल्या झाल्या हार घातल्यावर खेळाचा दर्जा दिला पाहिजे’
अडीच वर्षांपूर्वी 2019 मध्ये विधानसभा निवडणुकांवेळी भाजपचा मुख्यमंत्री होणार असे पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगत होते, तेव्हा उद्धव ठाकरे काही का बोलले नाहीत, असा सवाल करताना राज ठाकरे म्हणाले,’ पंतप्रधान मोदी जेव्हा भाषण करायचे. त्या मंचावर उद्धव ठाकरे बसलेले. मोदी जाहीर भाषणात सांगतात. सत्ता येईल आणि देवेद्र फडणवीस होईल. शहा भाषणात सांगतात. फडणवीस मुख्यमंत्री होईल. तेव्हाच आक्षेप का घेतला नाही. त्यावेळीच त्यांना फोन का केला नाही. सर्व निकाल लागल्यावर तुम्हाला आठवलं.?
भाजप-शिवसेना युतीसाठी लोकांनी मतदान केल्यानंतर शिवसेनेने महाविकास आघाडी स्थापन करणे चुकीचे होते, अशी टीका राज ठाकरे यांनी केली. ते म्हणाले, ‘ लोकांनी मतदान कुणाला केलं होतं. दोन्हीकडच्या मतदारांना काय वाटलं असेल. सेना भाजप नको म्हमून मतदान केलं तुम्ही त्यांच्यासोबत गेला. भाजप सेनेच्या मतदारांना वाटत असेल दोन्ही काँग्रेस नको म्हणून तुम्हाला मतदान केलं. ते नकोत म्हणून मतदान केलं आणि तुम्ही त्यांच्यासोबत जाता. ही हिंमत होते कशी. जेव्हा लोकं शासन करत नाही. शिक्षा करत नाही. तेव्हाच ही हिंमत होते. आम्ही तुम्हाला मतदान करणार नाही. तुम्ही आमच्या मतांची किमत केली नाही. तुम्ही प्रतारणा करता हे सांगत नाही तोपर्यंत महाराष्ट्राच्या नशिबी हेच राहणार आहे.