मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रभर दौरा करुन, ठिकठिकाणी सभा घेऊन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्याविरोधात प्रचार केला. एकूण दहा सभा महाराष्ट्रात घेतल्या. त्यानंतर आता मनसेचे नेते, कार्यकर्ते राज ठाकरेंनी सभांमधून मांडलेले मुद्दे पुढे नेत आहेत. त्यासाठी कालच नवी मुंबई शहरातील मनसेने 56 प्रश्नांचा पेपर प्रसिद्ध केला होता. त्यानंतर आता मनसेने ‘रॅप’ रिलीज केला आहे.
मनसेचे नेते योगेश चिले यांच्या संकल्पनेतून आणि मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे आणि नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या निर्मितीतून हे रॅप तयार झाले आहे. गायक ए. जे. यांनी हे रॅप गायले आहे. ‘लाव रे तो लाव तो व्हिडीओ लाव…लाव रे तो लाव रे तो व्हिडीओ लाव’ असे रॅपचे बोल आहेत.
वाचा : 56 मार्कांचा पेपर, 2 दिवसांचा अवधी, मनसेचा मोदींवर ‘पेपर स्ट्राईक’
राज ठाकरेंनी मोदी सरकारची पोलखोल करण्यासाठी ज्या व्हिडीओंचा वापर केला, ज्या बातम्यांच्या कात्रणांचा वापर केला, त्यांचा वापर करत रॅप तयार करण्यात आले आहे. नोटाबंदी, बेरोजगारी, पुलवामा हल्ला, पाकिस्तान अशा विविध मुद्द्यांवरुन या रॅपमधून मोदी सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे. मनसेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरुन हे रॅप पोस्ट केले आहे. सध्या फेसबुक, ट्विटरसह विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हे रॅप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
मनसेने लोकसभा निवडणुकीत एकही उमेदवार उभा केला नसला, तरी सक्षम विरोधी पक्ष म्हणून जो प्रचार करायला हवा, तो मनसेकडून मोठ्या गंभीरतेने आणि प्रभावीपणे केला जातो आहे. राज ठाकरे यांचं सभांमधून ऑडिओ-व्हिज्युअल प्रेझेंटेशन, त्यानंतर 56 प्रश्नांची प्रश्नपत्रिका काढून भाजपला आव्हान आणि आता रॅप तयार करण्यात आलं आहे. नव्या माध्यमांचा वापर करुन, मनसेने लोकसभा निवडणुकीत मोदी-शाहांसह भाजपला धारेवर धरलं आहे.
पाहा मनसेचं रॅप :