मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून मनसे नेते संदीप देशापांडे (Sandip Deshpande) यांचं नाव चर्चेत आहे. कारण पोलिसांनी मनसे (MNS) कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केल्यानंतर पोलिसांना गुंगारा देऊन जाणाऱ्या संदीप देशापांडे यांच्यावर अनेक आरोप झाले. संदीप देशपांडे गाडीतून निघताना एक महिला पोलीस कर्मचारी (Mumbai Police) धक्का लागून कोसळल्याचा प्रकार घडला होता. मात्र माझ्यामुळे या महिला कर्मचारी कोसळल्या नाहीत, असे संदीप देशपांडे वारंवार सांगत होते. तर शिवसेनेकडून यावरून टीका होत होती. त्यानंतर पोलिसांनी याच प्रकरणात संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्यावर गुन्हा दाखल केला आणि त्यांचा शोधही सुरू केला. मात्र संदीप देशपांडे आज्ञातवासात गेले. त्यानंतर त्यांनी अटकपूर्व जामीनासाठी कोर्टात धाव घेतली. त्यांना कोर्टात अटकपूर्व जामीनही मिळाला. मात्र त्यांची पोलीस कोठडी मागणाऱ्या पोलिसांना आज कोर्टाने झापलं आहे. हा सर्व प्रकार काल्पनिक असल्याचे मत कोर्टाने नोंदवले आहे.
या प्रकरणात पोलिसांनी कोठडी मागितला असता हा सर्व प्रकार काल्पनिक आहे. हे प्रकरण कोणत्याही तथ्यावर अधारित नाही. आरोपींच्या कोठडीसाठी कोणतेही ठोस कारण नाही. खास अधिकारांच्या आणि कल्पनाशक्तिच्या आधारे केस बनू शकत नाही. देशपांडे आणि धुरी यांचा जाणीवपूर्वक इजा पोहचवण्याचा हेतू नव्हता, असेही कोर्टाने खडसावलं आहे.
या निर्णयावर प्रतिक्रिया देताना संदीप देशपांडे म्हणाले, ही पोलिसांना नसून सरकारला चपराक आहे. राज्य सरकारच्या दबावाखाली पोलीस काम करत होते. चुकीची कलमं लावण्याचा प्रयत्न या माध्यमातून झाला. आम्ही सरकारविरोधात बोलतो, आवाज उठवतो, म्हणून आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न होती. मात्र आमचा न्यायालयावर विश्वास आहे. यामध्ये आमचा कुणालाही धक्का लागला नव्हाता. तेच मत कोर्टाने नोंदवलं आहे. आणि त्याआधारेच हा निर्णय दिला आहे. कुठलाही कटकारस्थान करण्याचा हेतू आरोपींचा नव्हता असे कोर्टाने म्हटलं आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी संदीप देशपांडे यांनी दिली आहे.
काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंची औरंगाबादेतली सभा पार पडली. त्यानंतर राज ठाकरेंनी भोंग्याविरोधातील आंदोलन आणखी तीव्र केले. तर दुसरीकडे पोलिसांनी मनसे नेत्यांची धरपकड सुरू केली. यावेळी संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनाही ताब्यात घेण्यासाठी पोलीस गेले असता हा प्रकार घडला होता. त्यातच आता संदीप देशपांडे यांना मोठा दिलासा आणि पोलीस आणि सरकारला मोठी चपराक कोर्टाने दिली आहे.