मुंबईः एकनाथ शिंदे गट, ढासळती शिवसेना आणि महाविकास आघाडीतील नाराजी आणि पडद्यामागून राजकारण करणारं भाजप या सगळ्यांत शिवसेना चहुबाजूंनी घेरली गेलीय. सत्ता स्थापनेचा दावा केला जाऊन कधीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचं सरकार कोसळण्याची स्थिती आहे. त्यातच आता मनसेनंही (MNS) शिवसेनेला घरचा आहेर दिलाय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस शालिनीताई ठाकरे (Shalinitai Thackeray) यांनी उद्धव ठाकरेंच्या सद्यस्थितीवर बोचणारी टीका केली आहे. स्वतःच्या पक्षात केमिकल लोच्या कधी झाला, हे यांना कळलेही नाही, असं वक्तव्य शालिनीताईंनी ट्विटरच्या माध्यमातून केलं आहे. ठाकरे कुटुंबियांकडून झालेली ही टीका उद्धव ठाकरेंना चांगलीच वर्मी लागू शकते.
विधान परिषद निवडणूकीपासून एकनाथ शिंदेंनी घडवून आणलेल्या मोठ्या बंडावरून शालिनीताई ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. ट्विटरच्या माध्यमातून त्या म्हणाल्या, स्वतःच्या पक्षात केमिकल लोच्या कधी झाला, हे कलानगरच्या सर्किटला समजलेच नाही….’
काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी एका सभेत राज ठाकरेंवर निशाणा साधत त्यांचा काहीतरी केमिकल लोच्या झाल्याचं म्हटलं होतं. आता शालिनी ठाकरे यांनीही शिवसेनेच्या बिकट परिस्थितीत उद्धव ठाकरेंच्या वर्मावर बोट ठेवलंय.
स्वतःच्या पक्षात केमिकल लोच्या कधी झाला, हे कलानगरच्या सर्किटला समजलेच नाही…#सर्किट #कलानगर #केमिकललोच्या #विधानपरिषदनिवडणूक #एकनाथ_शिंदे #शिवसेना
— Shalini Thackeray (@ThakareShalini) June 24, 2022
दरम्यान, गुवाहटीत जमा झालेले शिवसेनेतील बंडखोर आमदार आज महत्त्वाची बैठक घेत आहे. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील या बैठकीत आज महाराष्ट्र सरकार स्थापन करण्यासंदर्भात तसेच शिवसेना पक्षावर दावा करण्यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष आता गुवाहटीकडे लागलं आहे. एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडे शिवसेनेचे 40 पेक्षा जास्त आमदार असल्याचं सांगितलंय. 12 अपक्ष आमदारांचाही पाठिबा असल्याचं म्हटलंय. त्यामुळे आता एकनाथ शिंदे गटाकडे एकूण 52 आमदारांचं संख्याबळ तयार झालंय. याच संख्याबळाच्या आधारे एकनाथ शिंदे विधानसभा उपाध्यक्षांकडे शिवसेना पक्षावर दावा करण्याविषयी महत्त्वाची मागणी करू शकतात.
एकिकडे गुवाहटीत फुटलेल्या आमदारांची महत्त्वाची बैठक सुरु असतानाच मुंबईत देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावरही मोठी खलबतं सुरु आहेत. सरकार स्थापन करण्यासाठी कायदेशीर बाजू पडताळण्यासंबंधी येथे गांभीर्यानं चर्चा सुरु असल्याचं सांगितलं जातंय.
तर दुसरीकडे महाविकास आघाडी कोसळण्याच्या स्थितीत असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीही अलर्ट मोडवर आहे. वाय बी चव्हाण सेंटरवर शरद पवार यांच्या उपस्थितीत आज सकाळपासूनच बैठकांचा सिलसिला सुरु आहे.