भाजप संविधान बदलणार असल्याचा आणि आरक्षण घालवणार असल्याचा फेक नरेटिव्ह सेट करून काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत विजय मिळवता आला. पण महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभेत काँग्रेसचा हा नरेटिव्ह बिलकूल चालला नाही. दोन्ही राज्यात भाजपचे मुख्यमंत्री बसले. या दोन्ही राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा अत्यंत दयनीय पराभव झाला. राहुल गांधी यांचा संविधान बदलण्याचा मुद्दा अजिबात चालला नाही. याबाबतचा मॅट्रिक्सने एक सर्व्हे केला आहे. या सर्व्हेनुसार, विधानसभा निवडणुकीत मोदी मॅजिकच चाललं. मोदी मॅजिकच्या समोर विरोधक धारातीर्थी पडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचंड लोकप्रियतेमुळेच महाराष्ट्र आणि हरियाणात भाजपचा विजय झाल्याचं मॅट्रिकच्या सर्व्हेत म्हटलंय.
महाराष्ट्र आणि हरियाणातील विजयावर मॅट्रिक्सच्या सर्व्हेत अनेक मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत करण्यात आलं आहे. मोदींचा प्रभाव आणि काँग्रेसच्या नेतृत्वातील विरोधकांची आघाडी भाजपला टक्कर देण्यात अपयशी ठरल्याचाही यात समावेश आहे. हा सर्व्हे 25 नोव्हेंबर ते 14 डिसेंबरच्या दरम्यान महाराष्ट्र आणि हरियाणात करण्यात आला. या सर्व्हेसाठी महाराष्ट्रातून 76 हजार 830 आणि हरियाणातून 53 हजार 647 सँपल घेण्यात आले. या सर्व्हेतील सहा मुद्दे समजून घेऊया.
लोकसभा निवडणुकीत भाजपला भलेही 240 जागा मिळाल्या असतील. पण महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता कायम असल्याचं हा सर्व्हे सांगतो. मोदी हे एक बडे आणि प्रभावशाली नेते असल्याचं लोकांच्या मनात आहे. त्यामुळेच दोन्ही राज्यातील जनतेने मोदींच्या नावावर भरभरून मतदान केल्याचं आढळून आलं आहे. मोदींच्या या लोकप्रियतेमुळेच विधानसभा निवडणुकीत लोकांनी भाजपच्या बाजूने कौल दिल्याचं स्पष्ट झालं आहे. महाराष्ट्रात 55 टक्के लोकांमध्ये मोदींची लोकप्रियता कायम असल्याचं दिसून आलं. तर हरियाणात 53 टक्के लोकांमध्ये मोदींची जादू असल्याचं दिसून आलं आहे.
मागच्या इतर लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत 2024च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला चांगलं यश मिळालं होतं. पण त्यालगोलग झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला. राहुल गांधी यांची लोकसभा निवडणुकीतील स्क्रिप्ट विधानसभा निवडणुकीत चालली नाही. 400 पारचा नारा देणारी भाजप संविधान बदलणार आहे. त्यासाठीच त्यांना एवढ्या जागा हव्या आहेत, असा प्रचार काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत केला होता. पण महाराष्ट्र आणि हरियाणाच्या निवडणुकीत या प्रचाराचा काहीच परिणाम झाला नाही. या निवडणुकीत शेती आणि पहिलवानांचे मुद्देही प्रभावीपणे मांडण्यात काँग्रेस अपयशी ठरल्याचं निकालावरून स्पष्ट दिसत असल्याचं सर्व्हेत म्हटलं आहे.
या सर्व्हेनुसार, महाराष्ट्र आणि हरियाणातील लोकांचा राहुल गांधींवर फारसा विश्वास राहिलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर विश्वासू आणि पर्यायी चेहरा देण्यात विरोधक अपयशी ठरले. त्यामुळेही विरोधकांचा मोठा पराभव झाला. याशिवाय मतदारांमध्ये काँग्रेसबाबत संशय होता. मोदींच्या प्रभावापुढे राहुल गांधी टिकू शकले नाहीत. त्यांना जनतेचे प्रश्न मांडता आले नसल्याचंही या सर्व्हेतून स्पष्ट दिसून आलं आहे.
महाराष्ट्र आणि हरियाणातील लोकांनी लोकसभा निवडणुकीत भाजपला मतदान केलं नाही. पण विधानसभा येताच या लोकांनी भाजपला जवळ केलं. भाजपच्या ओंजळीत भरभरून मतदान केलं. त्याचं कारण म्हणजे मोदींची प्रतिमा, मोदींचं नेतृत्व आणि केंद्राचं काम हे होतं, असंही हा सर्व्हे सांगतो.
या सर्व्हेत भाजपच्या विधानसभा निवडणुकीतील राजकीय संदेशावरही अभ्यास करण्यात आला. एक है तो सेफ हैचा नारा महाराष्ट्र आणि हरियाणात देण्यात आला. त्याला लोकांना प्रचंड पाठिंबा मिळाला. मोदींच्या नेतृत्वातील स्थिरता, राष्ट्रीय सुरक्षा आणि आर्थिक विकासावरही भाजपने जोर दिला. या उलट काँग्रेसच्या नेत्यांची बेताल बडडब, दिशाहीन मुद्दे, अंतर्गत कलह यामुळे काँग्रेसला मोठं नुकसान झालं.
हरियाणात भाजपने मनोहर लाल खट्टर यांच्या जागी नायब सैनी यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची सूत्रे दिली. भाजपने केलेल्या या बदलामुळे लोकांचा भाजपवर विश्वास बसल्याचं सर्व्हेतून दिसून आलं आहे. भाजपच्या या रणनीतीचा मतदारांवर सकारात्मक प्रभाव पडला. तसेच स्थानिक स्तरावर बड्या नेत्यांची उपस्थिती आणि निवडणुकीचं अचूक मॅनेजमेंट यामुळेही भाजपला यश मिळालं. स्थानिक मुद्दे आणि योजनांमुळे लोकांनी भाजपला साथ दिली. दोन्ही राज्यात भाजपच्या कार्याचा मोठा प्रभाव पडल्याचंही या सर्व्हेतून स्पष्ट झालं आहे.