ठाकरे-पवार यांच्यातील बैठक संपली, उद्धव ‘सिल्व्हर ओक’वरुन निघाले, कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा?

| Updated on: Apr 11, 2023 | 9:53 PM

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यातील बैठक संपली आहे.

ठाकरे-पवार यांच्यातील बैठक संपली, उद्धव सिल्व्हर ओकवरुन निघाले, कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा?
Follow us on

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यातील बैठक अखेर संपली आहे. या चार नेत्यांमध्ये जवळपास सव्वा एक तास चर्चा झाली. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानाहून रवाना झाले आहेत.  महाविकास आघाडीत समन्व राहावं, मतभेद उघडपणे समोर येऊ नयेत, या विषयावर ही बैठक झाल्याची माहिती समोर येत आहे.

राज्यात गेल्या चार ते पाच दिवसांमध्ये विरोधी पक्षांमध्ये मतभेद असल्याचं बघायला मिळालं. अनेक मुद्द्यांवरुन महाविकास आघाडीत मतभेद असल्याचं समोर आलं. राज्यात आगामी काळात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. महाविकास आघाडीची राज्यात वज्रमुठ सभादेखील सुरु झाल्या आहेत. पण दुसरीकडे महाविकास आघाडीत वारंवार मतभेद समोर येत आहेत. त्यामुळे आगामी काळात भाजपसमोर आव्हान म्हणून उभं राहायचं असेल तर आपली वज्रमुठ घट्ट होण्याची गरज असल्याचं एकमत या बैठकीत झाल्याची माहिती समोर येत आहे.

हे सुद्धा वाचा

महाविकास आघाडीत नेमके मतभेद काय?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची डिग्री, उद्योगपती गौतम अदानी यांच्या जेपीसी चौकशीची मागणी आणि निवडणुकीत ईव्हीएम मशीनचा वापर यावरुन महाविकास आघाडीत मतभेद सुरु असल्याचं बघायला मिळालं. मोदींच्या डिग्रीवरुन राष्ट्रवादी काँग्रेसने एक वेगळी भूमिका घेतली. मोदींच्या डिग्री विषयी चर्चा करण्याची गरज नाही, असं राष्ट्रवादीने म्हटलं. तर संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तींची डिग्री खरी असली पाहिजे, असं ठाकरे गटाचं म्हणणं आहे.

उद्योगपती गौतम अदानी यांच्या जेपीसी चौकशीपेक्षा कोर्टाच्या समितीकडूनच चौकशी व्हावी, अशी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे. तर ठाकरे गट आणि काँग्रेस चौकशीवर ठाम आहे. ईव्हीएमच्या मुद्द्यावरुन सुद्धा महाविकास आघाडीतील मतभेद समोर आले आहेत. तर दुसरीकडे आज चंद्रकांत पाटील यांचं बाबरी मशिदबाबत मोठं विधान समोर आलं. त्यांच्या त्या वक्तव्यावर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी टीका केलीय. पण चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी समर्थन केलं आहे.