नागपूर : राज्यात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) व अजित पवार (Ajit Pawar) यांचा पहाटे झालेला शपथविधीवरुन पुन्हा वादळ उठले आहे. त्याला निमित्त ठरले राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (jayant patil)यांचे विधान. जयंत पाटील जे बोलून गेले त्यावरुन आता भाजपकडून शरद पवार (Sharad Pawar) यांच्यांवर हल्लाबोल केला जात आहे. राज्यात या शपथविधीवरुन घमासान सुरु असताना या शपथविधीचे खरे हिरो असलेले देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी पत्रकारांना मजेशीर उत्तर दिले आहे.
नेमकं काय म्हणाले जयंत पाटील?
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी ही शरद पवार यांची खेळी असू शकते. राज्यात राष्ट्रपती राजवट होती. ती उठवणे आवश्यक होते. त्यामुळे पवार यांची ती खेळी असू शकते, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
बाबनकुळे यांचा हल्लाबोल
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जयंत पाटील यांच्या वक्तव्यानंतर शरद पवार यांच्यांवर हल्लाबोल केला आहे.जयंत पाटील शरद पवार यांना बदनाम करत आहे का ? असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला.
बाबनकुळे म्हणाले की, जयंत पाटील खरे बोलत असतील तर शरद पवार जनमतविरोधात का जात आहेत. त्यावेळी फडणवीस यांना १६५ जागा मिळाल्या होत्या. मग पवार यांना फडणवीस चालत नाही का? कोणती कारणे आहेत, ज्यामुळे पवार यांना फडणवीस नको आहेत? उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाण्यासाठी शरद पवार यांनी शकुनीची भूमिका निभावली.
राज्यात शरद पवार यांच्यांबद्दल जो आदर होता, आता त्याबद्दल चिंता व्यक्त होते आहे. पवार जनमत न मानता कपटकारस्थान करण्यात वस्ताद आहे. जनमताच्या विरोधात गेल्यामुळे त्यांच्या जीवनावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. जयंत पाटील यांच्या म्हणण्यानुसार पवार यांनीच अजित पवार यांना बळीचा बकरा बनवला का? असा प्रश्न बाबनकुळे यांनी उपस्थित केला.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले
पहाटेच्या शपथविधीसंदर्भात देवेंद्र फडणवीस यांना २६ जानेवारी रोजी पत्रकारांनी प्रश्न विचारला. जयंत पाटील यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया विचारली. यावेळी त्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत, विषयावर बोलणे टाळले. आज प्रजासत्ताक दिन असल्याने कोणतंही राजकीय वक्तव्य करणार नाही, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली. त्यानंतर दोन दिवसांत त्यांनी प्रतिक्रिया दिली नाही.
अजित पवार काय म्हणाले
पहाटेचा शपथविधी ही शरद पवार यांची खेळी होती का? यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, महागाई, बेरोजगारी आणि इतर महत्त्वाच्या विषयांना बगल देण्यासाठी या चर्चा सुरू झाल्या आहेत. आपण यापुर्वीच म्हटले आहे की या सगळ्या प्रकाराविषयी मी काहीही बोलणार नाही.
म्हणजे पहाटेच्या शपथविधीचे हिरो असणारे देवेंद्र फडणवीस व अजित पवार या विषयावर बोलण्यास तयार नाही अन् भविष्यातही बोलणार नाही. त्यांच्या पक्षातील नेते मात्र त्यावर प्रतिक्रिया देत आहेत. त्यामुळे असे कोणते राज आहे की हे दोन्ही नेते ते उलगडण्यास तयार नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
प्रकाश आंबेडकर स्पष्टच म्हणाले
वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर म्हणातात, पहाटेच्या शपथविधीच्या दिवशी नेमकं काय झालं होतं हे एकतर देवेंद्र फडणवीस सांगू शकतात किंवा अजित पवार सांगू शकतात. त्यामुळे आपण या विषयावर काही बोलणार? आताच नाही तर मी पूर्वीपासून सांगतो की शरद पवार हे भाजपाचीच साथ देतात. त्यामुळे जर जयंत पाटील यांनी जे काही सांगितले त्यात मला धक्कादायक काहीच वाटत नाही.
शरद पवार बरेच काही सांगून गेले
पहाटेच्या शपथविधीवर राज्यात चर्चा सुरु असताना शरद पवार यांना शनिवारी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना यावर प्रश्न विचारण्यात आला. आता याला दोन वर्ष झाली आहेत. कशाला तो विषय करता, असे सांगत त्यांनीही उत्तर देणे टाळले. मग त्यांच्या प्रदेशाध्यक्षांनी दोन वर्षानंतर हा विषय का उपस्थित केला? हे पवार जयंत पाटील यांना विचारणार का? अशी चर्चा आहे.
पहाटेचा शपथविधी कधी झाला?
२३ नोव्हेंबर २०१९ ला देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. या शपथविधी सोहळ्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एका रात्रीत राष्ट्रपती राजवट उठवली होती.