दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांच्या एका वक्तव्यावरुन काल मोठा वाद झाला. महिला आयोगाने सुद्धा त्यांच्या या वक्तव्याची दखल घेतली. अरविंद सावंत बोलताना माल म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याचा संदर्भ शायना एनसी यांच्याशी होता. शायना एनसी यांनी हा मुद्दा लावून धरला. त्यांनी अरविंद सावंत यांना फटकारलं. “बाहेरचा माल चालणार नाही. मुंबादेवीमध्ये इथलाच माल चालणार, अमिन पटेल” अस अरविंद सावतं म्हणाले होते. शायना एनसी यांनी अरविंद सावंत यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला. “राजकारणात सक्षम असलेल्या महिलेला माल संबोधलं, यांची मानसिक स्थिती ठीक नाही” असं शायना एनसी म्हणाल्या. आज अरविंद सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. शायना एनसी या मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवार आहेत.
“आमच्या मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचा आशिष शेलारांनी जो उल्लेख केला. त्यासाठी त्यांच्यावर कुठला गुन्हा दाखल झाला का?. ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्याने एका मुलीवर बलात्कार केला, त्याच्यावर कुठला गुन्हा दाखल झाला?. वामन म्हात्रे पत्रकार बहिणीबद्दल बोलले, त्यांच्यावर कुठला गुन्हा दाखल झाला?. संजय राठोड तुमच्यासमोर आहे, त्याच्याबाबत काय केलं?. गुलाबराव पाटील यांनी हेमा मालिनी यांच्याबद्दल जे वक्तव्य केलं, त्यांच्यावर कुठला गुन्हा दाखल झाला?” असे प्रश्न अरविंद सावंत यांनी विचारले.
अरविंद सावंत काय म्हणाले?
“आमच्याकडून महिलांचा अपमान कधीच होणार नाही. मी कधीही महिलेचा अपमान केला नाही करणार नाही. माझ्या एका वक्तव्याचा वेगळा अर्थ काढण्यात आला. माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो” असं अरविंद सावंत म्हणाले. ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी शिवसेनेच्या मुंबादेवी मतदारसंघाच्या उमेदवार शायना एन. सी. यांनी मुंबईच्या नागपाडा पोलीस ठाण्यात जावून तक्रार दाखल केली.
शायना एनसी काय म्हणाल्या?
“महिलेला माल म्हणून तुम्ही बघता. एक सक्षम महिला, प्रोफेशनल 20 वर्ष स्वबळावर काम करुन पुढे आली आहे. तुम्ही तिच्यासाठी माल सारखे शब्द वापरता. तुमची मानसिक स्थिती त्यातून सगळ्यांना कळते. महाराष्ट्रातील महिला उबाठाला मतदान करणार नाही. महिलांचा सन्मान केला, तर आदर आहे. महिलांना माल बोलवलं, तर तुमचे जे हाल होणार ते 20 तारखेला बघा” असं शायना एनसी म्हणाल्या.