निवृत्ती बाबर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 7 ऑगस्ट 2023 : मणिपूर येथील हिंसेवरून ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनाच सवाल केला आहे. दोन दिवसांपूर्वी मी मणिपूरला गेलो. तिकडे ओपन फायरिंग सुरू आहे. घरं पेटवत आहेत. महिलांना विवस्त्र फिरवलं जातंय. दुर्दैवानं राष्ट्रपतीही महिला आहेत. राष्ट्रपती रबर स्टँप आहेत हे खरंच आहे. आम्ही भेटलो. त्याही अशाच समाजातल्या आहेत. पण तुम्हाला राग नाही येत, चीड येत नाही का?, असा संतप्त सवाल खासदार अरविंद सावंत यांनी केला आहे.
उद्धव ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेडचा काल मुंबईत संयुक्त मेळावा पार पडला. यावेळी अरविंद सावंत यांनी मणिपूरच्या मुद्द्यावरून उद्वेग व्यक्त केला. बाजारात सगळेच विकाऊ आहेत. पण विकली न जाणारी सगळी माणसं शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडकडे आहेत. आमचं नाव गेलं, चिन्ह गेलं. पण तुम्हाला अभिमान वाटेल. निष्ठावंतांची गंगा मातोश्रीवर जोरदार वाहत होती. कठीण प्रसंगी अनेक जण उभे राहिले. कम्युनिस्ट पक्ष आला. संभाजी ब्रिगेड आली. भगवा तर फडकवायचाच आहे. पण महाराष्ट्राचं हित जोपासायचंय. त्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत, असं अरविंद सावंत म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार देण्यात आला. त्यावरूनही त्यांनी टीका केली. स्वराज्य माझा जन्म सिद्ध हक्क आहे, असं लोकमान्य टिळकांनी म्हटलं. पण ज्यांचा सत्कार झाला, त्यांना लोकमान्यांच्या नावाने पुरस्कार दिला गेला. मी मी करणाऱ्याला हा पुरस्कार दिला गेला, असा टोला सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला.
गेल्या 10 वर्षात आमच्या मुंबई बंदराचा विकास नाही झाला. विकासाचं स्वप्न उद्धव ठाकरेंनी पाहिलं होतं. तुम्ही विकास केला नाहीच पण करूही दिला नाही. इंटरनॅशनल फायनान्स सर्व्हिस सेंटर गुजरातला घेऊन गेलात. हुतात्म्यांनी प्राण देऊन मुंबई मिळवली आहे. तुमचं योगदान काय आहे त्यात? असा सवाल करतानाच जेएनपीटीही गुजरातला नेली. गिरण्यांचं पुनरुज्जीवन केलं जात नाही. ती जिवंत मुंबई आम्ही पाहिली. त्या मुंबईसाठी तुम्ही एकही काम केलं नाही, असं सावंत म्हणाले.
फक्त फॉक्सकॉनच नाही, अनेक उद्योग महाराष्ट्राच्या बाहेर नेले आहेत. तुम्ही देशाचे पंतप्रधान की गुजरातचे पंतप्रधान आहात? सगळं तिकडे जातंय आम्ही षंढ, आम्ही गद्दार, आम्ही मिंधे, शिंदे म्हणजे महाराष्ट्राला लागलेला कलंक. हा कलंक कसा पुसणार? असा सवाल त्यांनी केला.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा मुद्दा मांडला. 10 वर्ष झाली अजूनही दर्जा मिळाला नाही. बेळगावचा मुद्दा तसाच राहिला. फक्त अर्थ संकल्पाच्य़आ शेवटच्या पानावर बेळगाव, कारवारचा प्रश्न असतो. जेव्हा निवडणुका लागतात तेव्हा देवेंद्र फडणवीस मराठी माणसाचा पराभव करण्यासाठी कर्नाटकात जातात. गद्दार मिंधेही तिकडे गेले. कर्नाटकाला त्यांची जागा दाखवून देण्याची गरज आहे, असं सांगतानाच लडाख, काश्मीर हे भाजपचं सर्वात मोठं अपयश आहे. ते लपवायचं असेल म्हणून त्यांचं हिंदू, मुस्लिम सुरू आहे, असंही ते म्हणाले.