“परिवर्तनाची सुरुवात विदर्भातून होते. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, आम्ही त्याकडे महाविकास आघाडी म्हणून पाहतो. रामटेकला आमचा उमेदवार नाही, पण आमचे लोक कामाला लागलेत. हळूहळू रंग चढत जाईल” असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. सी व्होटर सर्वेने महाराष्ट्रात महाविकास आघाडीला काही जागा दाखवल्या आहेत, त्यावर राऊत म्हणाले की, “जे काही त्यांनी दाखवलय, त्याच्याशी सहमत नाही. महाराष्ट्रात आम्ही 100 टक्के यश मिळवण्याच्या मार्गावर आहोत”
“देवेंद्र फडणवीस त्यांच्यासाठी 45 प्लसचा आकडा सांगतात. त्यांचा आकडा काहीही असेल, निवडणुकीनंतर भाजपाला आकडे लावायचच काम करावं लागणार आहे” अशी टीका संजय राऊत यांनी केली. “महाराष्ट्रात महाविकास आघाडी 35 जागा जिंकेल, देशात इंडिया आघाडीला 305 जागा मिळतील” असा दावा संजय राऊत यांनी केला.
‘राम त्यांच्याचमागे उभा राहतो’
‘मोदींसारखा आम्ही 405 चा दावा करणार नाही’ असं ते म्हणाले. “विरोधकांच रामावरच प्रेम नकली, राजकीय ढोंग आहे. कोणताही संघर्ष, लढ्यात ते नव्हते. राम पळपुट्यांच्या मागे उभा राहत नाही. जे मैदानावर उभे राहून आत्मविश्वासाने लढतात, राम त्यांच्यामागे उभा राहतो” असं संजय राऊत म्हणाले.