खरच मुंबईत ठाकरे गटाने 25 जागा मागितल्यात का? संजय राऊत काय बोलले?

| Updated on: Jul 19, 2024 | 11:13 AM

"एक व्यक्ती आहे या देशात जी स्वत:ला विष्णूचा तेरावा अवतार समजते. एक व्यक्ती आहे या देशात प्रभू श्रीराम यांचं बोट धरुन मीच त्यांना अयोध्येच्या राम मंदिरात घेऊन गेलोय असं त्यांना वाटतं. ते नसते, तर अयोध्येत प्रभू श्रीराम यांची प्राण प्रतिष्ठा झाली नसती असं त्यांना वाटतं"

खरच मुंबईत ठाकरे गटाने 25 जागा मागितल्यात का? संजय राऊत काय बोलले?
sanjay raut
Follow us on

आगामी विधानसभा निवडणुकीत मुंबईत ठाकरे गटाकडून 25 जागांची मागणी करण्यात येणार अशी चर्चा आहे. मुंबईत विधानसभेचे 36 मतदारसंघ आहेत. आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना पत्रकार परिषदेत या संदर्भात प्रश्न विचारण्यात आला. मुंबईत ठाकरे गटाकडून 25 जागांची मागणी करण्यात येतेय, त्यावकर त्यांनी ‘या बाबत अजून निर्णय झालेला नाही’, असं उत्तर दिलं. “मुंबई शिवसेनेचा गड आहे. लोकसभा आणि विधानसभेला आम्ही इथून जागा जिंकल्या आहेत. विदर्भात जसं काँग्रेसला, पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी शरद पवार गटाला जास्त जागा मिळतात, तसं मुंबई-कोकणात शिवसेनेचा प्रभाव आहे, गड आहे. जिथे ज्याचा प्रभाव आहे, त्या हिशोबाने सीट्सच वाटप होईल” असं संजय राऊत म्हणाले.

महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असणार? या प्रश्नावर ते म्हणाले की, ‘मविआमध्ये या क्षणी जो चेहरा आहे, तो महाराष्ट्राला माहित आहे’ संजय राऊत यांनी मोहन भागवत यांच्या एका विधानाचा संदर्भ पकडून नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. “विष्णूचा अवतार कोण आहे? नॉन बायोलॉजिकल व्यक्ती कोण? हे देशाला माहित आहे. भागवत यांनी मोकळेपणाने बोललं पाहिजे. देशात अल्पमताच सरकार आहे. या देशात जे होतय, ते देशात लोकाशाहीसाठी, संविधानासाठी योग्य नाही. देशात कॉमन मॅन सुपरमॅन आहे. कॉमन मॅनने देव समजणाऱ्यांना बहुमतापासून दूर ठेवलं” असं संजय राऊत म्हणाले.

‘एक व्यक्ती या देशात स्वत:ला विष्णूचा तेरावा अवतार समजते’

“एक व्यक्ती आहे या देशात जी स्वत:ला विष्णूचा तेरावा अवतार समजते. एक व्यक्ती आहे या देशात प्रभू श्रीराम यांचं बोट धरुन मीच त्यांना अयोध्येच्या राम मंदिरात घेऊन गेलोय असं त्यांना वाटतं. ते नसते, तर अयोध्येत प्रभू श्रीराम यांची प्राण प्रतिष्ठा झाली नसती असं त्यांना वाटतं. एक व्यक्ती आहे या देशात जी स्वत:ला सुपरमॅन समजते. एक व्यक्ती आहे या देशात जी आपण अजैविक पद्धतीने जन्माला आलोय, म्हणजे मला वरुन देवानं जन्माला घातलं अशा पद्धतीने लोकांना भ्रमित करते. एक व्यक्ती आहे या देशात, जी रशिया-युक्रेनच युद्ध मीच थाबवलं असं म्हणते, पण ती व्यक्ती मणिपूर, काश्मीरचा हिंसाचार थांबवू शकत नाही. मला असं वाटत मोहन भागवत त्याच व्यक्ती विषयी बोलले आहेत” असं संजय राऊत म्हणाले.