Sanjay Raut : औरंगजेब फॅन्स क्लब भाजपा, गुजरातमध्ये, संजय राऊतांचे जिव्हारी लागणारे शब्द

| Updated on: Jul 27, 2024 | 11:02 AM

Sanjay Raut : "देवेंद्र फडणवीस हे राजकारणात पावसाळयात उगवलेल्या छत्रीसारखे आहेत. . आज महाराष्ट्र त्यांचा द्वेष करतो, त्यांना खलनायक मानतो. याला ते स्वत: जबाबदार आहेत. महाराष्ट्रात सत्तेवर यावं लागेल. फडणवीस आणि त्यांच्या लोकांनी केलेली घाण साफ करावी लागेल" असं संजय राऊत म्हणाले.

Sanjay Raut : औरंगजेब फॅन्स क्लब भाजपा, गुजरातमध्ये, संजय राऊतांचे जिव्हारी लागणारे शब्द
Follow us on

“बॅनर लावणं ही लोकभावना आहे. पोस्टर, बॅनर लावा म्हणून आम्ही सांगत नाही. लोक आपल्या भावना अशा पद्धतीने व्यक्त करतात. त्या विषयी दु:ख वाटण्याचं कारण नाही. काही पक्षात तीन-तीन नेत्याचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागतात. महायुतीत सात लोक मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत. उद्धव ठाकरे यांनी या राज्याच मुख्यमंत्री म्हणून संकटकाळात नेतृत्व केलं. राज्य, देश संकटात असताना त्यांनी ज्या पद्धतीने नेतृत्व केलं, ते लोक विसरलेले नाहीत” असं खासदार संजय राऊत म्हणाले. “उद्धव ठाकरे एक आश्वासक चेहरा आहे. संघर्षातून ते वारंवार उभे राहतात. फिनिक्स पक्ष्याप्रमाणे झेप घेतात” असं गुणगान संजय राऊत यांनी केलं.

“नरेंद्र मोदी आणि अमित शाह या गुजरातच्या दोन व्यापाऱ्यांनी सत्ता, दहशतीच्या बळावर हिंदूह्दय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना ओरबडून घेतली. चिन्ह, पक्ष ओरबडून घेतलं. गद्दाराच्या हातात दिली. त्यांना वाटलं नेतृत्व संपलं म्हणजे शिवसेना संपली. त्या संकटकाळात सुद्धा उद्धव ठाकरे जिद्दीने उभे राहिले. 9 खासदार वेगळ्या चिन्हावर निवडून आणले. आज विधानसभा जिंकण्याच्या दिशेने आम्ही दमदार पावलं टाकत आहोत हे सोपं नाही” असं संजय राऊत म्हणाले.

औरगंजेब फॅन्स क्लब भाजपात

“या राज्याची जनता उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी उभी राहिली. गुजरातमधून औरंगजेबाचे कितीही चेले, चपाटे आले तरी त्यांना महाराष्ट्रात शिवसेना, ठाकरेंना खतम करत येणार नाही. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. इथे छत्रपती शिवाजी फॅन क्लब चालतो. औरंगजेब फॅन्स क्लब भाजपा, गुजरातमध्ये आहे. कारण औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झाला” असं संजय राऊत म्हणाले.

‘फडणवीस आणि त्यांच्या लोकांनी केलेली घाण साफ करावी लागेल’

“देवेंद्र फडणवीस हे राजकारणात पावसाळयात उगवलेल्या छत्रीसारखे आहेत. अलीकडे राजस्थान, मध्य प्रदेशात मुख्यमंत्री नेमले गेले ते कोणालाही माहित नव्हते, तसच अनेक अनुभवी नेत्यांना डावलून देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बनवलं गेलं. आज महाराष्ट्र त्यांचा द्वेष करतो, त्यांना खलनायक मानतो. याला ते स्वत: जबाबदार आहेत. त्यांनी नेतृत्वाची संधी गमावली. भाजपाच्या कपटनितीने महाराष्ट्राच नुकसान केलं. ते भरुन येणं सोपं नाही. त्यासाठी महाराष्ट्रात सत्तेवर यावं लागेल. फडणवीस आणि त्यांच्या लोकांनी केलेली घाण साफ करावी लागेल” असं संजय राऊत म्हणाले.