नाशिक : “ज्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे ते हक्कभंग समितीमध्ये आहेत. ज्यांच्यावर मी भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे पुरावे दिले आहेत ते हक्कभंग समितीचे अध्यक्ष आहेत. अशा समितीपुढे कुणाला न्याय मिळू शकतो? मी काही चुकीचं बोललो नाही. सर्वोच्च न्यायालयात चोर मंडळाच्या बाबतीत प्रकरण प्रलंबित आहे. एका विशिष्ट गटापुरता तो शब्द आहे. ज्या विधिमंडळाने मला राज्यसभेत चारवेळा निवडून पाठवलं त्या विधिमंडळाबद्दल मी अशब्द कसा वापरेल? ठिक आहे, संजय राऊत याच्याविरोधात काहीना काही काड्या करत राहायच्या. तुम्ही काड्या करा, आम्ही बांबू घालू”, असा घणाघात खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला.
“काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी गेली, तशीच आपली खासदारकी रद्द करण्याचा प्रयोग चालू आहे. मी माफी मागितली असती तर तुरुंगातही गेलो नसतो. माझ्यामध्ये सुद्धा या महाराष्ट्राचं स्वाभिमानाचं रक्त आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्राचं रक्त आहे. बाळासाहेब ठाकरेंनी माझ्यावर केलेले संस्कार गुडघे टेकण्याचे नाहीत”, असं संजय राऊत ठामपणे म्हणाले.
“मी माफी मागितली असती तर सुरत, गुवाहाटी, गोवा करत परत मुंबईत आलो असतो, माझं तुरुंगात जाण्यापासून रक्षण झालं असतं. मला आणि माझ्या कुटुंबाला जेरीस आणण्यासाठी माझ्याविरोधात जे असंख्य खोटे गुन्हे दाखल केले आहेत, ते मला टाळता आलं असतं. पण त्यापैकी मी काही केलं नाही”, असं राऊत म्हणाले.
“मी ठामपणे एका निष्ठेने हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबर आहे. कागदावर कुणी शिवसेना नेली असेल ती शिवसेना नाही. त्या विषारी धोतराच्या बिया आहेत. ते तुम्हाला भविष्यात कळेल. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना खरी आहे. त्या शिवसेनेबरोबर मी आहे. त्यासाठी पडेल ती किंमत चुकवायला मी तयार आहे”, असं राऊत म्हणाले.
“ऑफर्स आणि धमकी आम्हालाही आल्यात. पण मी घाबरत नाही. फक्त राहुल गांधी घाबरत नाहीत असं नाही. आम्हीसुद्धा घाबरत नाही. माझं कोल्हापूरमधलं भाषण आहे. तुम्ही 2 फेब्रुवारीचं कोल्हापुरातील वृत्तपत्र पाहू शकता. मी माझ्या मतावर ठाम आहे”, असं राऊत म्हणाले. अनेक प्रश्न अधांतरी आहेत. मुळात सरकारचं घटनाबाह्य आहे. अशा सरकारकडून काय अपेक्षा करणार? या सरकारवरच अपात्रतेची टांगती तलवार आहे. महाराष्ट्रातला शेतकरी हवालदिल आहे. नुसता हवेतल्या घोषणा करत आहेत, अशी टीका त्यांनी केली.
“दिवसाढवळ्या खून पडत आहेत. पोलिसांवर दबाव आहे. राजकीय कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. त्यांच्यावर दबाव आणले जात आहेत. हे काही कायदा-सुव्यवस्थेचं लक्षण नाही. एक टोळी राज्य करतेय. जेव्हा टोळ्या राज्य करतात तेव्हा महाराष्ट्रात आता जसं राज्य चालवलं जातंय तसं राज्य चालवलं जातं”, असं संजय राऊत म्हणाले.