नाशिक : स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी महात्मा गांधींच्या सल्ल्यानुसार माफी मागितली होती, असं वक्तव्य संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केलं होतं. त्यावरुन राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून खासदार संजय राऊत यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत अपमानकारक उद्गार काढणाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत. त्यानंतर आज नाशिकमधून बोलताना संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांना देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेल्या ‘भारतरत्न’ने सन्मानित करण्याचं आवाहन केलंय. (MP Sanjay Raut’s appeal to honor Swatantryaveer Savarkar with ‘Bharat Ratna’ award)
स्वातंत्र्यवीर सावरकर हे या देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचे महानायक होते. त्यांनी देशाला क्रांतीची दिशा दाखवली. त्यांनी अनेक क्रांतिकारक निर्माण केले. ब्रिटीशांच्या मनात दहशत निर्माण केली. मदनलाल धिंग्रासारखे लोक निर्माण केले. ते क्रांतिकारकांचे शिरोमणी होते. त्यांना खलनायक ठरवण्याचा प्रयत्न मागील काही काळापासून होत आहे. हे एकप्रकारे कारस्थान आहे, कपट आहे. ते उधळून लावलं पाहिजे. त्यासाठी माझं पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांना आवाहन आहे. सावरकरांवरील चिखलफेक थांबवायची असेल तर त्यांना ‘भारतरत्न’ने सन्मानित करा, असं आवाहन राऊत यांनी केलंय.
सेनापतीचं राजकारण गेल्या काही वर्षांपासून सुरु झालं आहे. या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात गांधींचं जेवढं स्थान आहे. तेवढंच पटेल, सावरकर, भगतसिंग आणि टिळकांचं आहे. त्या सर्वांनी देशासाठी समान त्याग केल्याचंही राऊत म्हणाले. टीका करण्याचा अधिकार सर्वांना आहे. पण गलिच्छपणे टीका करणाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणीही राऊत यांनी यावेळी केलीय.
तत्पूर्वी दैनिक सामनाच्या ‘रोखठोक’ या सदरामधूनही शिवसेनेने सावरकरांविषयी आपली रोखठोक भूमिका मांडली आहे. या लेखात नायकावर चिखलफेक करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं म्हटलं गेलं आहे. “पारतंत्र्यात सावरकर हे सगळय़ांचे नायक होते. स्वातंत्र्यानंतर त्यांना खलनायक ठरवण्याचा प्रयत्न सुरू झाला तो आजही सुरूच आहे. आजही स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवातही सावरकर या देशाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहेत. सावरकरांविषयी द्वेष आणि विष पसरवूनही ते लोकांच्या मनावर अढळपणे विराजमान आहेत.”
“सावरकरांसंबंधी आतापर्यंत खूप खोटे बोललं गेलंय. त्यांनी ब्रिटिश सरकारपुढे अनेक दया याचिका दाखल केल्या हे अनेक वेळा अनेकांनी सांगितलंय. परंतु त्यांनी त्यांच्या सुटकेसाठी या याचिका दाखल केल्या नाहीत. सर्वसाधारणपणे कुठल्याही कैद्याला दया याचिका दाखल करण्याचा अधिकार असतो. विशेष म्हणजे तुम्ही दया याचिका दाखल करा, असं महात्मा गांधींनीच सावकरकरांना सांगितलं होतं. गांधींच्या सूचनेवरूनच त्यांनी दया याचिका दाखल केली होती आणि महात्मा गांधींनी सावरकरांना तुरुंगातून मुक्त करण्याचं इंग्रजांना आवाहन केले होते. आम्ही ज्या प्रकारे शांततेच्या मार्गाने देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढत आहोत, त्याच मार्गाने सावरकर लढतील असं गांधींजींनी इंग्रजांना सांगितलं होतं”, असंही राजनाथ सिंह पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात म्हणाले.
राजनाथ सिंह म्हणाले की, “वीर सावरकर एक महान स्वातंत्र्य सेनानी होते, अशा परिस्थितीत विचारसरणीच्या चष्म्यातून पाहून त्यांच्या योगदानाकडे दुर्लक्ष करणे आणि त्यांचा अपमान करणे क्षम्य नाही. वीर सावरकर एक महान नायक होते, आहेत आणि भविष्यातही राहतील. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याची त्यांची इच्छाशक्ती किती प्रबळ होती, याचा अंदाज अनेक प्रसंगावरुन आला.ब्रिटिशांनी त्यांना दोनदा जन्मठेपेची शिक्षा सुनावली, पण ते मागे हटले नाहीत.”
इतर बातम्या :
राज ठाकरेंना कोरोना, पण अमित ठाकरे इन अॅक्शन मोडमध्ये; पाच शाखांचे उद्घाटन करणार
MP Sanjay Raut’s appeal to honor Swatantryaveer Savarkar with ‘Bharat Ratna’ award