अहमदनगर : विखे आणि पवार कुटुंबामधील राजकीय सुंदोपसुंदी, दोन्ही कुटुंबातले वाद, जुन्या पिढीतील वैमनस्य, त्याचे काहीच महिन्यापूर्वी उमटलेले पडसाद या गोष्टी महाराष्ट्राला परिचित आहेत. पण विखे पवारांची आताची पिढी मॉडर्न आहे. विचारांनी प्रगल्भ आहे. हे सगळं सांगायचं कारण म्हणजे विखे-पवारांमधील राजकारणापलीकडची मैत्री…! काल नगरचे खासदार सुजय विखे पाटील आणि राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार यांनी एकाच विमानातून प्रवास केला आणि इम्प्रेस झालेल्या सुजय विखेंनी तो फोटो आपल्या फेसबुकवर शेअर केला.
माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ सुजय विखे पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांची काल औरंगाबाद विमानतळावर भेट झाली. सुजय विखे आणि पार्थ पवारांनी एकाच विमानाने प्रवासही केला. औरंगाबाद ते मुंबई असा त्यांचा प्रवास होता.
विमान प्रवासादरम्यान सुजय विखे आणि पार्थ पवार यांच्यामध्ये छान गप्पांची मैफल रंगली. सध्याची राजकीय घडामोडींवर ओझरती चर्चा झाली. बाकी इतरही अनेक महत्त्वांच्या विषयांवर उभय नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिली. जवळपास 40-50 मिनिटे दोघांनी शेजारी शेजारी बसून एकत्र विमानप्रवास केला.
प्रवासानंतर सुजय विखे पाटील पाटील यांनी पार्थ पवार यांच्यासोबतचा फोटो आपल्या फेसबुकवर शेअर केला. ‘मैत्रीला सीमांचं बंधन नसतं’, असं म्हणत त्यांनी तो फोटो पोस्ट केला. या फोटोवर हजारो जणांनी लाईक्सचा वर्षाव केला तर कमेंट्समधून आपली मतं मांडली. काही कमेंट्स या दोघांची मैत्री अधोरेकित करणाऱ्या होत्या, तर काही कमेंट दोघांच्याही फिरकी घेणाऱ्या होत्या.
महाराष्ट्राची राजकीय संस्कृती किती प्रगल्भ आहे, हेच सुजय विखेंनी पार्थ पवारांसोबतचा फोटो शेअर करुन दाखवून दिलं. किंबहुना दोन पक्षांचे नेते एकत्र भेटून गप्पांची मैफल रंगवतात, याचं आता लोकांना काही आश्चर्यही वाटत नाही. परंतु सध्या ज्या प्रकारे विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये हमरी तुमरी पाहायला मिळते, वैयक्तिक आरोप प्रत्यारोपांचे वार पाहायला मिळतात, त्यात मात्र अशा भेटी व्हायला हव्यात, गप्पांची मैफल रंगायला हवी, राजकारणापलीकचे जाऊन मैत्र जपायला हवं…!
जवळपास तासाभराच्या प्रवासानंतर दोघा नेत्यांनी एकमेकांचा निरोप घेतला. ‘कुछ बातें हो चुकी हैं, कुछ बातें अभी है बाकी’ या गीताचे बोल आठवणूच त्यांनी लवकरच भेटूयात, म्हणत एकमेकांना हस्तांदोलन करत एकमेकांचा निरोप घेतला.
पाहा व्हिडीओ :