मुंबई| 4 सप्टेंबर 2023 : जालन्यात मराठा समाजातील आंदोलकांवर लाठीचार्ज झाला. याविरोधात प्रचंड संतापाचा लाट पसरली आहे. अशातच राज्य सरकारच्या वतीने पत्रकार परिषद घेण्याच आली. यात सरकारची भूमिका स्पष्ट करण्यात आली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या संपू्र्ण घटनेवर भाष्य केलं आहे. मराठा आरक्षण न्यायालयात टिकलं पाहिजे, असं अजित पवार यांनी म्हटलं. 2014 ला जेव्हा देवेंद्र फडणवीस यांचं सरकार सत्तेत होतं. फडणवीस यांच्या काळातील आरक्षण उच्च न्यायालयात टिकलं होतं. आताही तसेच प्रयत्न केले जातील, असा शब्द अजित पवार यांनी दिला.
मागच्या काळात मराठा समाजाने अतिशय शांततापूर्ण पद्धतीने आंदोलनं केली. ही आंदोलनं कौतुकास्पदच होती. पण जालन्यात जे झालं ते चूकच होतं. असं होता कामा नये, असं अजित पवार म्हणाले. सातत्याने आरोप केला जातोय की, वरून आदेश दिले. वरून आदेश दिले… पण हे आदेश कुणी दिले? असे आदेश दिलेत, असं तुमचं म्हणणं असेल तर ते सिद्ध करून दाखवा, असं अजित पवारांनी म्हटलं.
काहीजण राजकीय पोळी भाजण्याचं काम करत आहेत. पण माझं मराठा समाजाला आवाहन आहे की, बांधवांनो कृपया शांतता राखा. मराठा आरक्षणासंदर्भातल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली आहे. सरकार मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक आहे. सरकार यासाठी योग्य ती पावलं उचलेल, असं अजित पवार म्हणालेत.
शासन आपल्या दारी कार्यक्रमाला अजित पवार अनुपस्थित होते. त्यावर बोलताना मी आजारी होतो. त्यामुळे मी कार्यक्रमाला गैरहजर होतो. पण याबाबत गैरसमज पसरवला गेला, असं म्हणत अजित पवार यांनी शासन आपल्या दारी कार्यक्रमातील गैरहजेरीवर प्रतिक्रिया दिली आहे.
जालन्यातील लाठीचारानंतर राज्यात एकच संतापाची लाट उसळली. गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाऊ लागली. अशात आज पत्रकार परिषद घेत सरकारची बाजू मांडण्यात आली आहे. यावेळी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागितली आहे. 2014 लाही युतीचं सरकार सत्तेत होतं. यावेळी माझ्या सरकारच्या काळात पाच हजार आंदोलनं झाली. तेव्हा कधीच बळाचा वापर केला नव्हता. आता बळाच्या वापरामुळे ज्यांना इजा झाली आहे, जखमी झाले आहे. त्यांची मी क्षमा याचना करतो. क्षमा मागतो, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.