मुंबई: राज ठाकरेंना (Raj Thackeray) एवढं महत्त्व देऊ नका. सध्या माझ्याकडे तेवढा वेळ नाही. आज धनंजय मुंडे (Dhanajay Munde) हा माझ्या दृष्टीने महत्त्वाचा विषय आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली. राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांना भोवळ आल्यामुळे कालपासून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुंबईतल्या ब्रीज कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांची भेट घेण्यासाठी गेलेल्या अजित पवार यांनी पत्रकारांच्या प्रश्नांवर प्रतिक्रिया दिली. राज ठाकरे यांच्या ठाण्यातील उत्तर सभेनंतर अजित पवारांची ही पहिलीच प्रतिक्रिया आहे. मात्र वेळ मिळेल तेव्हा सगळ्या प्रश्नांची आणि आरोपांची उत्तरं मी देईन, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं. राज ठाकरे यांनी ठाण्यातील उत्तर सभेत महाविकास आघाडीतील प्रत्येक मंत्री आणि नेत्यांचा खरपूस समाचार घेतला. यात पवार कुटुंबियांवरही त्यांनी सडकून टीका केली. मशीदीसमोर भोंगे वाजवण्याचे राज ठाकरेंनी जे आवाहन केले होते, त्यावर अजित पवार यांनीही टीका केली होती. त्या टीकेतील वक्तव्यांचा आधार घेत राज ठाकरे यांनी उत्तर सभेत अजित पवार यांचा समाचार घेतला.
मुंबईतल्या ब्रीज कँडी रुग्णालयात सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना भेटायला गेलेल्या अजित पवार यांना राज ठाकरेंच्या सभेतील आरोपांबाबत प्रश्न विचारण्यात आले त्यावेळी ते म्हणाले,’ आज मी धनंजय मुंडेंना भेटायला आलेलो आहे. कुणीतरी काहीतरी बोलतं. तुम्ही त्यांना फार महत्त्व देऊ नका. माझ्या दृष्टीने आज धनंजयची तब्येत जास्त महत्त्वाची आहे. माझा सहकारी अॅडमिट आहे. त्याला भेटायला आलेलो आहे. दुसऱ्याही प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे आहेत. त्याला योग्य उत्तरं योग्य वेळी देईन.
राज ठाकरेंनी ठाण्यातील उत्तर सभेत पवार कुटुंबीयांवर चांगलाच निशाणा साधला. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीच जातीपातीचं राजकारण सुरु केल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच राज ठाकरेंना आत्ताच भोंगे दिसले का असा सवाल करणाऱ्या अजित पवारांचाही त्यांनी खरपूस समाजार घेतला. भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीनंतर शरद पवारांनी त्यांच्या कानाखाली जो आवाज काढला, त्यानंतर अजित पवारांना तीन-चार महिने ऐकू येत नव्हतं. त्यांच्या कानात नुसता कू-कू असा आवाज येत होता. त्यामुळे आतापर्यंत भोंगे काढून टाका, असं मी तीन वेळा बोललोय, हे त्यांना ऐकूच गेलं नाही. पण लॉकडाऊननंतर अजित पवारांचा कान साफ झाला आणि गुढी पाडव्याचा भोंगा त्यांना ऐकू आला, असा टोलाही राज ठाकरे यांनी लगावला.