मुंबई : साई रिसॅार्टशी माझा संबंध नसल्याचं मी वारंवार सांगत होतो. माझ्यावर खोटे आरोप केले गेले. रिसॅार्टचं सांडपाणी समुद्रात जातं म्हणून ईडीने चौकशी केली. दीड वर्षे नाहक बदनामी केली गेली. या बदनामीचा खटला मी हायकोर्टात दाखल केलाय, असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी आरोप केले आहेत.
प्रकरण अंगलट येतंय म्हणून ते मागे घेतले गेले. एनजीटीने या प्रकरणात तथ्य नसल्याचं सांगितलं. परंतु अब्रू जाईल म्हणून मागे घेतलं गेलं. हायकोर्टातील प्रकरणंही त्यांना मागे घ्यावी लागतील. रिसॅार्ट सुरू नसताना सांडपाणी समुद्रात जाईल कसं?असा रिपोर्ट सर्व तपास यंत्रणांनी दिला आहे. सत्र न्यायालयाने हा गुन्हा रद्द केलाय. वेगवेगळे खोटे गुन्हे दाखल केले आहेत. ते रद्द केले जावेत म्हणून कोर्टात गेलोय, असं अनिल परब म्हणाले आहेत.
अनिल परब यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावरही टीका केली आहे. किरीट सोमय्यांना एक दिवस नाक घासून माफी मागावी लागेल किंवा 100 कोटीचा दावा द्यावा लागेल. हायकोर्टात मुद्दा होता तर एनजीटीत याचिका दाखल कशाला करायची? सगळीकडे खोट्या याचिका दाखल केल्या आहेत. राजकीय हेतूने प्रेरीत आरोप केले गेले आहेत, असं ते म्हणालेत.
सदानंद कदम यांनाही खोट्या गुन्ह्यात अडकवले आहे. खेडची सभा झाल्यावर लगेच त्यांना अटक केली गेली. कोर्टात त्यांना न्याय मिळेल. अब्रू नुकसानीच्या दाव्यावर मी ठाम आहे, असंही परब म्हणालेत.
गिरीश बापट यांच्या निधनामुळे पुणे लोकसभेची जागा रिक्त आहे. या जागेवर पोटनिवडणुकीची शक्यता आहे. इथे महाविकास आघाडीत रस्सीखेच पाहायला मिळत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी या जागेवर दावा करत आहेत. त्यावरही अनिल परब यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यातील जागेसंदर्भात अजून सेनेने भूमिका जाहीर केलेली नाही. वरिष्ठ नेते यावर निर्णय घेतील, असं ते म्हणालेत.
नितेश राणेंनी त्यांच्या भवितव्याचा विचार करावा. त्यांनी किती घड्याळ आणि हात बदलले हे सर्वांना माहिती आहे, असं म्हणत त्यांनी भाजपचे नेते नितेश राणे यांच्यावरही टीकास्त्र डागलंय.