मुंबई : इलेक्ट्रॉनिक पुरावे दाखवणार्या एनसीबीच्या अधिकार्याने कधी काऊंसिलिंग केले ते सांगावे, त्याचे व्हिडीओ रेकॉर्डिंग समोर आणावे, असं थेट आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीला दिले आहे. क्रुझवरील ड्रग्ज पार्टीत सापडलेल्या शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान याचे एनसीबीने काऊंसिलिंग केले अशा बातम्या चालवल्या जात असल्याचे नवाब मलिक यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्यावर नवाब मलिक यांनी संबंधित अधिकाऱ्याचा आपल्या शब्दात समाचार घेतला. (Nawab Malik challenges NCB to release video of Aryan Khan’s counseling)
एनसीबी आर्यन खान याचे काऊंसिलिंग जेलमध्ये करायला गेले होते का? अशी विचारणा करतानाच देशातील मोठे वकील हरीश सालवे बोलत आहेत हा पब्लिसिटी स्टंट आहे. त्यामुळे आता अशा पॉझिटिव्ह गोष्टींच्या बातम्या पेरल्या जात आहेत असाही थेट आरोप नवाब मलिक यांनी केला.
दरम्यान, मुंबई ड्रग्ज क्रुझ पार्टी प्रकरणात अटक करण्यात आलेला अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचे अंमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या (एनसीबी) कोठडीत समुपदेशन करण्यात आल्याची माहिती मिळतेय. त्यावेळी, इथून बाहेर पडल्यानंतर मी गरिब, आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास व्यक्तींसाठी काम करण्याचा प्रयत्न करेन, तसेच सर्वांना आपला अभिमान वाटेल, असेच काम करेन, असा शब्द आर्यनने समुपदेशनावेळी दिल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.
आर्यन खान सध्या आर्थर रोड कारागृहात आहे. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यासह पथकाने आर्यनचे समुपदेशन केले. तेव्हा त्याने भविष्यात आपले नाव चुकीच्या कारणासाठी प्रसिद्धीझोतात येणार नाही, याची काळजी घेण्याचं आश्वासन दिलं. आर्यनसह मूनमून धमेचा, नुपूर सारिका, इस्मित सिंग, मोहक जैस्वाल, विक्रांत चोकेर, गोमित चोप्रा, अरबाझ र्मचट यांना एनसीबीने मुंबई ड्रग्ज क्रुझ पार्टी प्रकरणात अटक केली आहे.
आर्यन खानच्या जामीन अर्जावरील निकाल कोर्टाने राखून ठेवला आहे. त्यामुळे 20 ऑक्टोबरपर्यंत आता आर्यनला जेलमध्येच राहावं लागणार आहे. क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात दोन दिवसांपूर्वी आर्यन खान तसेच अरबाज मर्चंट आणि मूनमून धमेचा या आरोपींच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. आर्यन खानच्या बाजूने अॅड. अमित देसाई यांनी युक्तिवाद केला. त्यांनी पूर्ण क्षमतेने आर्यन खानची बाजू मांडून त्याला जामीन देण्यात यावा अशी मागणी केली. तर एनसीबीच्या वकिलांनी विरोध केला. दोन्ही बाजू जाणून घेतल्यानंतर न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी आर्यन खानला कुटुंबीयांकडून 4500 रुपयांची मनी ऑर्डर आली आहे. कारागृह प्राधिकरणाकडे ही मनी ऑर्डर पाठवावी लागते. हे पैसे आर्यनच्या कँटीनच्या खर्चासाठी कूपनच्या स्वरुपात दिले जातात. जेल मॅन्युअलनुसार, कोणत्याही कारागृहातील आरोपीला महिन्यातून एकदा मनीऑर्डर मिळू शकते, जी साडेचार हजार रुपयांपेक्षा जास्त असू शकत नाही.
इतर बातम्या :
‘हर्बल तंबाखूच्या लागवडीला परवानगी द्या’, सदाभाऊ खोतांचं शरद पवारांना खोचक पत्र
Video : अमरावतीत जिल्हा नियोजन समिती बैठकीत राडा, यशोमती ठाकूर आणि रवी राणा यांच्यात जोरदार खडाजंगी!