मुंबई : महापालिका निवडणुकीच्या (Municipal Corporation Election) तोंडावर भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना चांगलाच रंगताना दिसून येत आहे. महापालिकेत भाजप नगरसेवक (BJP Corporators) आज पुन्हा एकदा आक्रमक झालेले पाहायला मिळाले. शुक्रवारी स्थायी समितीच्या (Standing Committee) ऑनलाईन बैठकीत अध्यक्ष यशवंत जाधव यांनी बोलू न दिल्यानं भाजप सदस्यांनी दालनाबाहेरच आंदोलन सुरु केलं. त्यावेळी शिवसेनेच्या सदस्यांनीही भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे वातावरण अधिकच तापल्याचं पाहायला मिळालं.
दरम्यान, महापालिकेतील वातावरण चिघळू नये यासाठी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी मध्यस्ती करत भाजप नगरसेवकांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, अध्यक्ष आम्हाला बोलूच देत नसल्याचा आरोप करत भाजप नगरसेवक आंदोलनावर ठाम राहिले. महापालिकेत भाजप सदस्यांचं 6 तासांपेक्षा अधिक काळ आंदोलन सुरु होतं.
मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतील सहा महत्वाच्या चौकाच्या लॅन्डस्केपिंगच्या प्रस्तावावरुन या वादाला तोंड फुटलं. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी चर्चा करु न देता प्रस्ताव मान्य केल्याचा आरोप करत भाजप नगरसेवकांनी दालनाबाहेरच ठिय्या आंदोलन सुरु केलं. दुपारी सुरु झालेलं हे आंदोलन रात्री साडे नऊ पर्यंत सुरु होतं.
त्यानंतर भाजप आमदार मिहीर कोटेचा यांनी भाजप नगरसेवकांची भेट घेतल आजचं आंदोलन मागे घेण्यास सांगितलं. आज हे आंदोलन थांबवा. उद्या आपल्याला हे आंदोलन मुंबईकरांपर्यंत घेऊन जायचं आहे. शिवसेनेचा भ्रष्टाचाराचा चेहरा मुंबईकरांसमोर उघडा करायचा आहे, त्यामुळे आजचं आंदोलन मागे घ्या अशी विनंती कोटेचा यांनी भाजप नगरसेवकांना केली.
आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेनुसार मुंबईतील सहा चौकांचे लॅन्डस्केपिंग करण्यासाठी महापालिकेला निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला. या चौकांच्या प्रकल्पाचा 19 कोटी 51 लाख रुपयांचा प्रस्ताव आज स्थायी समितीच्या पटलावर मांडण्यात आला होता. या प्रस्तावावर चर्चा करण्याची विनंती भाजप सदस्यांनी केली. मात्र, अध्यक्षांनी बोलू न देताच प्रस्ताव मंजूर केल्याचा आक्षेप भाजप नगरसेवकांनी घेतला आणि थेट दालनाबाहेर आंदोलनाला बसले होते.
इतर बातम्या :