मुंबई | 26 सप्टेंबर 2023 : नागपुरात दोन दिवसांआधी मुसळधार पाऊस पडला. यामुळे नागपूरच्या काही भागात पाणी साचलं. लोकांच्या घरात पाणी शिरलं. यावरून विरोधकांकडून सरकारवर आणि विशेषत: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत आहेत. आजच्या सामनाच्या अग्रलेखातूनही या पावसावर भाष्य करण्यात आलं आहे. नागपूर कोणी बुडवले? या शीर्षकाखाली आजचा सामनाचा अग्रलेख प्रसिद्ध झाला आहे. यात अप्रत्यक्षपणे संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय. मुंबई तुंबली म्हणून शिवसेनेकडे बोट दाखविणाऱ्यांचे आता नागपूरचे ‘तुंबापूर’ झालं. आता हे लोक कुठे आहेत? नागपूर कोणी बुडवले?, असं म्हणत सामनातून टीकास्त्र डागण्यात आलं आहे.
केवळ चार तासांच्या पावसात नागपूर बुडाले. त्यात तुमच्या विकासाच्या थापा गटांगळय़ा खाताना संपूर्ण महाराष्ट्राने पाहिल्या. या महापुराने नागपूरच्या स्वयंघोषित ठेकेदारांचा मुखवटाही गळून पडला. आता तरी ते आणि त्यांचा ‘परिवार’ काही ‘चिंतन’ करणार आहेत का? मुंबई तुंबली म्हणून शिवसेनेकडे बोट दाखविणाऱ्यांचे आता नागपूरचे ‘तुंबापूर’ झाले यावर काय म्हणणे आहे? नागपूर कोणी बुडवले? असा प्रश्न नागपूरकर विचारत आहेत. त्याचे आधी उत्तर द्या आणि मगच नागपूरच्या विकासाच्या वल्गना करा.
राज्याची उपराजधानी नागपूरच्या विकासाच्या वल्गना शनिवारी चार तासांच्या मुसळधार पावसात वाहून गेल्या. शुक्रवार मध्यरात्र ते शनिवार सकाळपर्यंत पडलेल्या पावसाने नागपुरात हाहाकार माजविला. नाग नदीला आलेल्या महापुराने पाच जणांचे बळी घेतले. दहा हजारांपेक्षा जास्त बैठी घरे, बंगले, झोपड्या, दुकाने यांचे भयंकर नुकसान झाले. अनेक गाड्या वाहून गेल्या. कमी काळात प्रचंड पाऊस हे या हाहाकाराचे कारण सांगितले जात आहे. त्यात तथ्य असले तरी नागपूरच्या विकासाच्या गप्पा शेवटी ‘गोलगप्पा’च ठरल्या या वस्तुस्थितीचे काय?
नागपूरच्या विकासाचा ठेका आणि मक्ता ज्या स्वयंघोषित ठेकेदारांकडे वर्षानुवर्षे आहे, त्यांच्याकडे या प्रश्नाचे काय उत्तर आहे? ते नसल्यानेच मग आक्रोश करणाऱ्या पूरग्रस्तांना हाताने धरून बाजूला करण्याची वेळ आज तुमच्यावर आली. एखाद्या पूरग्रस्ताचे तोंड तुम्ही तात्पुरते बंद करू शकाल, पण या महापुराने तुमचे तोंड पुरते बंद केले आहे हे लक्षात घ्या.
मागील काही वर्षांत नागपूर शहराने कशी चहूबाजूंनी प्रगती केली आहे, विकासकामांनी कशी भरारी घेतली आहे याचे ढोल पिटले जात आहेत. सिमेंटचे रस्ते, फ्लायओव्हर्स, मेट्रो रेल्वे, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेला मेट्रो आणि फ्लायओव्हर यांचा संगम असलेला ‘डबल डेकर व्हायाडक्ट’ अशी अनेक उदाहरणे देत तेथील दिला जातो. मात्र हा डंका किती पोकळ आहे, हा विकास कसा तकलादू आहे, हे शनिवारी पहाटे पडलेल्या चार तासांच्या पावसाने उघड केले.