मुंबई : एकनाथ शिंदे यांनी बंड केलं अन् राज्यात राजकीय भूकंप आला. त्या भूकंपामुळे शिवसेनेसह महाविकास आघाडी हादरली अन् महाविकास आघाडीचं ठाकरे सरकार कोसळलं. पण जेव्हा एकनाथ शिंदे यांच्यासोबत कोण होतं? कोणते मंत्री सोबत होते? कोणता आमदार गाडीत होता अन् एकनाथ शिंदे यांच्या मनात नेमकं काय सुरू होतं? त्यांनी कुणाला फोन केले असतील, असे अनेक प्रश्न राजकारणात रस असणाऱ्या लोकांना पडले होते. त्याची उत्तरं ठाकरे गटाचे नेते, आमदार नितीन देशमुख यांनी दिली आहेत. कारण बंडाच्या दिवशी नितीश देशमुख शिंदेंसोबत त्यांच्या गाडीत होते.
आदेश बांदेकर यांनी घेतलेल्या ‘आवाज कुणाचा’ या मुलाखत सत्रात नितीन देशमुखांनी बंडखोरीचा घटनाक्रम सांगितला आहे.
विधान परिषदेच्या निवडणुकीचा तो काळ होता. निकाल लागला अन् त्यानंतर विधानभवनातच एकनाथ शिंदे मला म्हणाले की नितीन चला, आपण बंगल्यावर जाऊ. तेव्हा ते आमचे नेते होते. नगरविकास मंत्री होते. त्यामुळे आमचे नेते म्हणाले की गाडीत बस तर नकार देण्याचा प्रश्न नव्हता. मी एकनाथ शिंदे यांच्या गाडीत बसलो. तेव्हा गाडीत कोल्हापूरचे आमदार मिटकर देखील सोबत होते. गाडीत बसून शिंदेसाहेबांच्या बंगल्यावर गेलो.
एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यावर संजय राठोड आले, संतोष बांगर आले. तेव्हा मी बांगर यांना म्हटलं की काही गडबड आहे का तर ते म्हणाले नाही. तसं काही नाही.
शिंदेसाहेबांनी मला आणि कोल्हापूरचे आमदार मिटकर यांना गाडीत बसवलं. म्हणाले चला ठाण्याला जाऊन येऊ. त्याच दिवशी मी परत मतदारसंघात जाणार होतो. त्यामुळे मी माझ्या पीएला फोन केला म्हटलं बॅग घेऊन ये. मी ठाण्याहून बसतो. पण आम्ही ठाण्याला गेलोच नाही.
आम्ही पालघरला गेलो. म्हटलं असेल पालघरमध्ये काही त्यामुळे मीही गेलो. पालघरला एका हॉटेलला आम्ही उतरलो. तिथं चहा वगैरे घ्यायला लागलो तर तेव्हा तिथं एकदम दोन-तीन मंत्र्यांच्या गाड्या आल्या. अब्दुल सत्तार यांची गाडी आली. तिथं संदिपान भुमरे यांची गाडी आली. शंभूराज देसाईंची गाडी आली. मग मला वाटलं काही तरी गडबड आहे.
ज्या हॉटेलवर थांबलो होतो तिथं पानटपरी वाल्याला विचारलं की हा रस्ता कुठे जातो. तर तो म्हणाला सूरतला… म्हणाला, इथून सूरत बॉर्डर शंभर किलोमीटर आहे. तिथून पुढे हा रस्ता सुरतला जातो. मग जवळपास हे निश्चित झालं होतं की काहीतरी गडबड आहे.
पण मी हिंमत सोडली नाही. म्हटलं आपण कुठेही गेलो तरी आपल्याला काही फरक पडत नाही. आपण पक्षाशी प्रामाणिक आहोत. त्यामुळे मी गाडीत बसलो. कोल्हापूरच्या आमदाराला त्यांनी दुसऱ्या गाडीत बसवलं. मी शिंदे साहेबांच्या गाडीत होतो.
शिंदे साहेबांच्या गाडीत तेव्हा पुढच्या सीटवर ते स्वत: होते. प्रभाकर नावाचा त्यांचा पीए होता. संदिपान भुमरे, अब्दुल सत्तार आणि मी असे आम्ही त्याच गाडीत होतो.
मग ते गाडीतून फोन लावायला लागले की तो निघाला का रे हा निघाला का… गाड्या कुठपर्यंत पोहोचल्या. तेव्हा मला खात्री झाली की आज नक्कीच मोठी घडामोड होणार आहे.
बायकोशी बोलतोय असं म्हणून मी अरविंद सावंत यांच्याशी बोललो. जे काही घडत आहे. त्याची त्यांना कल्पना दिली.
अखेर आम्ही सूरतला पोहोचलो. तिथे प्रचंड बंदोबस्तात आमदारांना ठेवण्यात आलं होतं. त्ययानंतर जे घडलं ते सगळ्यांनाच माहिती आहे.