मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. फार नाकाने कांदे सोलू नका, नाहीतर तुमचंच नाक कापलं जाईल, असं संजय राऊत म्हणालेत. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, अब्दुल सत्तार, दादा भुसे आणि आमदार राहुल कुल यांच्यावरही संजय राऊत यांनी गंभीर आरोप केलेत.
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील गणेश साखर कारखान्यात त्यांचा पराभव का झाला? कारण भ्रष्टाचार… त्यांचा पराभवही भाजपच्याच लोकांनी पराभव केलाय. झाकीर नाईक विखे पाटलांच्या संस्थेत साडे चार कोटी रुपये का देतो याची चौकशी करावी म्हणून गृहमंत्र्यांनी ईडीला पत्र लिहावं, असं राऊत म्हणालेत.
देवेंद्र फडणवीस यांचे खास दौंडचे आमदार राहुल कुल यांनी 500 कोटी रुपयांची अफरातफर केली आहे. भीमा सहकारी साखर कारखान्यात भ्रष्टाचार झाला. याची चौकशी कधी होणार?, असा सवाल संजय राऊतांनी विचारला आहे. मंत्री दादा भुसे यांची चौकशी कधी होणार?, असाही प्रश्न संजय राऊतांनी उपस्थित केला आहे.
तुम्ही खरोखर सच्चे असाल. तुमच्यावर खरंच संघाचे आणि अटलजींच्या विचारांचे संस्कार असतील तर तुमच्या मांडीला मांडी लावून जे बसलेत ना मुख्यमंत्री आणि त्यांची पोरं-टोरं हे खरे कोव्हीड घोटाळ्याचे लाभार्थी आहेत. आम्ही म्हणत नाही की हा घोटाळा झाला. पण तुम्ही हा भ्रष्टाचार झाल्याचं सांगता. तर मग या लाभार्थ्यांवर कारवाई करा, असं संजय राऊत म्हणालेत.
राज्यात काही चुकीचं घडत असेल तर त्यावर महाराष्ट्रातील पोलिसांनी कारवाई करणं अपेक्षित आहे. पण तिथं केंद्रीय तपास यंत्रणा घुसत आहेत. हा राज्यातील गृहखात्याचा अपमान आहे, असं संजय राऊत म्हणालेत.
सध्याचं सरकार सुडाच्या भावनेनं वागतंय. ठाकरे कुटुंबाची सुरक्षा काढणं, असे अत्यंत खालच्या दर्जाचे उद्योग सरकार करत आहे. हीच या सरकारची बौद्धिक आणि वैचारिक पातळी आहे. त्यामुळे त्यांच्याशी वाद घालण्यात अर्थ नाही. त्यांच्या कर्माची फळं त्यांना मिळतील, असं संजय राऊत म्हणालेत.
मणिपूर दोन महिनांपासून धगधगतंय. सरकारी आकडे काहीही म्हणो. पण चारशेहून अधिक निरपराध लोक मारले गेले आहेत आणि सरकार शांत बसलं आहे. पंतप्रधान युनायटेड स्टेट्समध्ये आहेत. पण इथं आमचं स्टेट मणिपूर धगधगतं आहे. या मुद्द्यावर सरकार सपशेल फेल ठरतंय. असं संजय राऊत म्हणालेत.