मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन विधानसभेत जोरदार राडा पाहायला मिळाला. विधानसभा अध्यक्षांच्या दालनात झालेल्या धक्काबुक्कीनंतर भाजपच्या 12 आमदारांचं 1 वर्षासाठी निलंबन करण्यात आलं आहे. तत्त्पूर्वी अधिवेशनातील चर्चेदरम्यान भाजपाचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या विधानावरून काँग्रेसने तीव्र आक्षेप घेतला. भाजपाचे आमदार काय धमकी देत आहेत का? सभागृहात धमकी दिली जात आहे, काय सुरु आहे? असा संतप्त सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विचारलाय. (Nana Patole alleges BJP MLA Sudhir Mungantiwar threatened the ruling party)
‘सभागृहाचे कामकाज सुरु असताना सत्ताधारी पक्षाचे सदस्य बोलू लागताच भाजपाचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं. विधिमंडळात मध्येच बोलले म्हणून अनिल देशमुख आता आतमध्ये जात आहेत हे मुनगंटीवार यांचे वक्तव्य धमकी देणारे आहे. सभागृहातच धमकी देण्यापर्यंत भाजपची मजल गेली आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर असून ईडी, आयकर, सीबीआय सारख्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून भाजप विरोधी पक्षांच्या लोकांना नाहक त्रास देत असल्याची ही कबुलीच आहे. हा सत्तेचा दुरुपयोग असून महाराष्ट्रात हा खेळ केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून भाजपाने चालवला आहे हे लोकशाहीला घातक आहे, असा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केलाय.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करणारा विद्यार्थी स्वप्नील लोणकर याच्या आत्महत्येचा मुद्दा विधानसभेत गाजला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे विधानसभेत आक्रमक झालेले पाहायला मिळाले आहेत. सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत स्वप्नील लोणकर याच्या आईचा व्हिडीओ स्क्रीनवर दाखवा. स्वप्नीलच्या आईचा आक्रोश प्रशासनातील निगरगट्ट अधिकाऱ्यांना आणि महाविकास आघाडी सरकारला पाहूद्या, अशी मागणी केली. सुधीर मुनंगटीवार यांनी विधानसभेत बोलताना टीव्ही 9 मराठीनं दाखवेल्या वृत्ताची दखल घेतली. स्वप्नील लोणकर याच्या कुटुंबीयांना 50 लाखांची मदत जाहीर करा, अशीही मागणी त्यांनी केली.
स्वप्नील लोणकर याच्या आत्महत्येनंतर 430 विद्यार्थी आम्हीपण आत्मदहन करु असा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे, अशी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. शंभरपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी फोन करुन सभागृहात हा विषय मांडण्याची मागणी केली आहे. नोकरीच्या वयोमर्यादेत दोन वर्ष वाढ द्या, म्हणजे विद्यार्थ्यांच्या मनावरचा ताण हलका होऊ शकतो, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले. स्वप्नील लोणकर याच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपये सरकारनं द्यावेत, अशी मागणी मुनगंटीवार यांनी केली.
संबंधित बातम्या :
तालिका अध्यक्ष म्हणून भास्कर जाधव यांचं नाव डांबराने लिहिलं जाईल, अतुल भातखळकरांचा घणाघात
Nana Patole alleges BJP MLA Sudhir Mungantiwar threatened the ruling party