मुंबई | 25 नोव्हेंबर 2023 : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे संविधान सन्मान महासभेचं आयोजन केलं. प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्या या कार्यक्रमाचं काँग्रेस नेते राहुल गांधी यांना निमंत्रण दिलं होतं. पण राहुल गांधी तेलंगणाच्या निवडणुकीत व्यस्त असल्याने त्यांच्या वतीने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी नाना पटोले यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या सभेला पाठिंबा दर्शवला. यावेळी त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात मतभेद होते. अखेर या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांचं मनोमिलन झाल्याचं बघायला मिळालं.
“प्रकाश आंबेडकर यांनी आमचे नेते राहुल गांधी यांना संविधान सन्मान महासभेचं निमंत्रण दिलं होतं. पण पाच राज्यांच्या निवडणुका चालू आहेत. आता शेवटच्या टप्प्यात तेलंगणात त्यांचा प्रचार सुरु आहे. राहुल गांधींनी तसं पत्र बाळासाहेब आंबेडकर यांना पाठवले. त्यांनी या कार्यक्रमाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मी राहुल गांधींचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आलो आहे. मी सुद्धा संविधान महासभेला शुभेच्छा देतो”, असं नाना पटोले म्हणाले.
“विशेषत: आमची भूमिका एकदम स्पष्ट आहे. जिथे संविधानाचा विषय आला, जे संविधान तोडायचा प्रयत्न करत असतील त्यांच्या विरोधातील लढाई आणि जे कुणी संविधानाच्या रक्षणासाठी एकत्रित येतात त्यांच्याबरोबर उभा राहण्याचा संकल्प आमच्या काँग्रेस पक्षाचा आहे. म्हणून या कार्यक्रमाचं राहुल गांधींनी निमंत्रण स्वीकारलेलं होतं. त्या निमित्ताने मी या ठिकाणी आलो आहे”, असं नाना पटोले म्हणाले.
“या देशात भाजपचं सरकार केंद्रात आल्यानंतर 2014, 2015 या काळात त्यांनी सर्वांना न्याय देण्याची भूमिका मांडली. पण घोषणाबाजी होती, जुमलेबाजी होती. पण जसं 2016 लागलं, त्यांनी आपला रंग दाखवण्याचं काम सुरु केलं. आपल्याला लक्षात असेल डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जे आर्थिक धोरण या देशासाठी बनवलं होतं ते धोरणच बदलण्याचा निर्णय केंद्राच्या भाजपच्या मोदी सरकारने घेतला”, असा आरोप पटोलेंनी केला. “बाबासाहेब आंबेडकर यांचं आर्थिक धोरण होतं की, मोठ्यांकडून टॅक्स घ्यायचा आणि शेवटच्या माणसापर्यंत तो पैसा पोहोचला पाहिजे”, असं ते म्हणाले.
“आपल्या देशाला ज्यावेळेस स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस आपल्या देशात रस्ते नव्हते, पिण्याच्या पाण्याची सुविधा नव्हती. फक्त 50 गावात वीज होती, आपल्याकडे मिलेट्री नव्हती. या सगळ्या परिस्थितीत बाबासाहेब आंबेडकरांचं आर्थिक धोरण पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यापासून मनमोहन सिंह सरकारने राबवलं. म्हणून आपण आज असंख्य लोक बाबासाहेब आंबेडकरांच्या आर्थिक धोरणामुळे जगतोय. पण जसं भाजपचं मोदी सरकार बहुमताचं आल्यानंतर या सरकारने बाबासाहेबांचं आर्थिक धोरण बदलवलं आणि जीएसटी धोरण आलं. याचं धोरण आणलं. यांनी बाबासाहेबांच्या धोरणाला उलटं केलं. त्यांनी आपल्याकडून पैसे गोळा केले आणि त्यांच्या मुठभर मित्रोंना पैसे देण्यास सुरुवात केली”, अशी टीका नाना पटोले यांनी केली.
“आपल्याला एकीकडे अन्न नाही, हाताला काम नाही, अशा परिस्थितीत या देशातील मूठभर लोकं श्रीमंत व्हायला लागली. त्यांच्याकडे नोटं छापण्याचे मशीन नव्हतं. मी या धोरणाचा कडाडून विरोध केला. तुम्ही हे नवे आर्थिक धोरण राबवत असाल तर या धोरणात शेतकरी, गरीबाचं धोरण असलं पाहिजे. तिथे माझं पंतप्रधान मोदी यांच्यासोबत भांडण झालं आणि तिथेच मी खासदारकीचा राजीनामा दिला. त्या जीएसटीचा परिणाम आपला देश भोगतोय”, असा घणाघात नाना पटोले यांनी केला.
“महाराष्ट्रात ओबीसी, मराठा, धनगर अशा विविध जातीच्या नागरिकांना प्रलोभन दिलं. साडेनऊ वर्षे झाली. मोदी सरकारचं काऊंटडाऊन सुरु झालं. पण महाराष्ट्रात आरक्षणाची व्यवस्था निर्माण झाली. या महाराष्ट्रात हे पाप आम्ही कधीच चालू देणार नाही, हे सांगण्यासाठी मी इथे आलो आहे. शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांना कलंक लावण्याचं काम राज्यातलं भाजप सरकार करत असेल, याचा विरोध कुणी करत असेल तर काँग्रेस त्यांच्याबरोबर उभं राहायला तयार आहे हे सांगण्यासाठी मी इथे आलो आहे”, असं नाना पटोले म्हणाले.