मोदींनी महाराष्ट्राला किती मदत केली?; आता काँग्रेसचा फडणवीसांना सवाल

| Updated on: Apr 03, 2021 | 7:03 PM

महाराष्ट्राला केंद्राकडून मिळालेल्या आर्थिक मदतीवरून आता राष्ट्रवादीपाठोपाठ काँग्रेसनेही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना धारेवर धरले आहे. (nana patole slams devendra fadnavis over central government's package)

मोदींनी महाराष्ट्राला किती मदत केली?; आता काँग्रेसचा फडणवीसांना सवाल
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
Follow us on

मुंबई: केंद्र सरकारने गेल्या वर्षी केलेल्या आर्थिक पॅकेजच्या घोषणेवरून आता राष्ट्रवादीपाठोपाठ काँग्रेसनेही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना धारेवर धरले आहे. केंद्रातील मोदी सरकारने महाराष्ट्राला कोरोनाच्या कठीण परिस्थितीत किती मदत केली हे फडणवीस यांनी सांगायला हवे, असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. (nana patole slams devendra fadnavis over central government’s package)

प्रसारमाध्यमांशी बोलताना नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र सोडलं. महाराष्ट्र सध्या कोरोना महामारीच्या मोठ्या संकटात आहे. राज्यातील परिस्थिती चिंताजनक आहे. राज्य सरकार सर्व पातळ्यांवर मोठ्या ताकदीने काम करत असताना राज्यातील विरोधी पक्ष मात्र बेजबाबदारपणे वागत असल्याची टीका पटोले यांनी केली.

केंद्राकडून दुजाभावाची वागणूक

गेल्या वर्षापासून राज्य कोरोनासह विविध संकटाचा सामना करत आहे. राज्यात संकटाची मालिकाच सुरू आहे. अशा परिस्थितीतही आघाडी सरकार जनतेला दिलासा देण्यासाठी नेहमी तत्पर राहिले आहे. कोरोनामुळे माझ्यासमोर आर्थिक संकट असतानाही जनतेच्या हितासाठी सरकारने कधीही हात आखडता घेतला नाही. परंतु दुर्दैवाने केंद्रातील मोदी सरकारने नेहमीच महाराष्ट्राला दुजाभावाची वागणूक दिली. राज्याच्या हक्काचा जीएसटी परतावा तसेच इतर निधीही देण्यास टाळाटाळ केली. राज्य संकटात असताना राज्यातील भाजपाचे नेते मात्र मविआ सरकारविरोधात कटकारस्थाने करत राहीले. कधी राजभवनच्या माध्यमातून, कधी काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून षडयंत्र रचण्यातच ते मग्न राहिले. केंद्रीय तपास यंत्रणांच्या आडून भाजपाच्या नेत्यांनी महाराष्ट्रातील वातावरण गढूळ करून देशात बदनामी केली. राज्याला आर्थिक मदतीची गरज असताना मुख्यमंत्री मदतनिधीत पैसे जमा न करता राज्यातील भाजपा नेत्यांनी पंतप्रधान केअर फंडात पैसे जमा केले, अशी टीकाही त्यांनी केली.

मोदी-शहा हे फडणवीसांना गांभीर्याने घेत नाहीत

राज्य सरकारला पॅकेज संदर्भात विचारणा करणारे देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेत्यांनी आधी नरेंद्र मोदी सरकारकडून महाराष्ट्राला भरीव आर्थिक मदत मिळावी यासाठी काय केले? हे सांगावं. मोदींनी जाहीर केलेल्या 20 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजचे काय झाले? या 20 लाख कोटी रुपयांतून महाराष्ट्राला किती कोटी मिळाले? याची उत्तरे त्यांनी जनतेला द्यावीत. फडणवीस यांची मागणी रास्तच आहे पण त्यांनी नरेंद्र मोदी यांच्याकडे विचारणा करणे अपेक्षित आहे, असं सांगतानाच कदाचित त्यांना दिल्लीत मोदी- शहा गांभीर्याने घेत नाहीत म्हणून ते राज्य सरकारच्या नावावर मोदींना सूचवत असावेत, अशी कोपरखळीही पटोले यांनी लगावली.

भाजपला नैतिक अधिकार नाही

यावेळी त्यांनी केंद्र सरकावरही टीका केली. कोरोना संकटात भरीव उपाययोजना करण्याचे सोडून देशातील जनतेला टाळ्या, थाळ्या वाजवण्याचे आवाहन करण्यापलिकडे केंद्रातील भाजपाच्या सरकारने काय केले? कसलीही तयारी न करता अचानक लॉकडाऊन लावून अख्या देशाला अंधारात ढकलून दिले. लाखो लोकांनी पायपीट करत गावाचा रस्ता धरला, त्यावेळी अनेकांनी रस्त्यातच जीव सोडला. सामान्य जनतेला आगीच्या खाईत लोटून देण्याचे पाप भाजपाने केले. लाखो लोकांचे संसार उघड्यावर आले. सामान्य जनतेला किती मरण यातना दिल्या हे जगाने पाहिले. पॅकेजच्या नावाखाली फक्त मोठ्या आकड्यांची जुमलेबाजी केली. देशाला देशोधडीला लावले त्या भाजपला महाराष्ट्र सरकारला प्रश्न विचारण्याचा नैतिक अधिकार नाही, असा घणाघाती हल्लाही त्यांनी केला. (nana patole slams devendra fadnavis over central government’s package)

 

संबंधित बातम्या:

मुख्यमंत्री हतबल, कुटुंबही सुरक्षित ठेवू शकले नाहीत; प्रवीण दरेकरांची टीका

मुख्यमंत्री म्हणाले, दोन दिवसात कठोर निर्णय, आता 4 एप्रिलपासून नवे नियम काय असू शकतात?

lockdown updates: वर्धा, नंदूरबार, बीड, चांदवडमध्ये कडक लॉकडाऊन; दुकानांपासून रिक्षापर्यंत सबकुछ बंद

(nana patole slams devendra fadnavis over central government’s package)