तेजस मोहतुरे, टीव्ही 9 मराठी प्रतिनिधी, भंडारा: शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव (prataprao jadhav) यांना केंद्र सरकारने माहिती तंत्रज्ञान विषयाच्या स्थायी समितीचे अध्यक्षपद दिले आहे. त्यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. राहुल गांधी (rahul gandhi) यांच्या भारत जोडो यात्रेला मिळत असलेला प्रतिसाद लक्षात घेता हा केंद्रातील मोदी सरकारचा हा अंतिम क्षण आहे. त्यामुळे हे सरकार जाणारच असल्याने कोणाला किती पदांचे वाटप करायेच ते त्यांना करू द्या, असा खोचक टोला नाना पटोले यांनी लगावला आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.
नाना पटोले यांनी यावेळी दसरा मेळाव्यावरही टीका केली. दोन शाहीर रात्रभर भांडून लोकांचे मनोरंजन करतात तसे दोन दसरा मेळावे झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कालच्या दसरा मेळाव्यात मोदी आणि शहा यांनी लिहून दिलेली स्क्रिप्ट वाचून दाखवली, असा हल्ला नाना पटोले यांनी चढवला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कालच्या दसरा मेळाव्यात राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवर टीका केली होती. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत ठाकरे समर्थकांचा भरणा अस्लयाचा आरोप शिंदे यांनी केला. शिंदे यांच्या या आरोपाचा पटोले यांनी समाचार घेतला. तुम्ही तर मोदी आणि शहांनी लिहून दिलेली स्क्रिप्ट वाचली. तुमचे काँग्रेसवरील आरोप चुकीचे आहेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी हे हस्यास्पद करावे याचं आश्चर्य आहे, असं ते म्हणाले. राहुल गांधी भारत जोडो यात्रेत देशाला जोडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असल्याचंही त्यांनी म्हटलं.
बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा सांगता पण याच बाळासाहेब ठाकरे यांनी राष्ट्रपतीपदासाठी काँग्रेस उमेदवार प्रतिभाताई पाटील व प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा दिला होता हे एकनाथ शिंदे यांना माहित नाही का? त्यावेळीही विरोध करण्याचे धाडस एकनाथ शिंदे यांनी केले होते का? स्वतःची राजकीय महत्वाकांक्षा व भाजपाच्या सल्ल्यावर मान डोलावणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसला दोष देणे थांबवावे, असंही ते म्हणाले.
यावेळी भिवंडी पोटनिवडणुकीत काँग्रेस आपला उमेदवार देणार नसल्यांच त्यांनी स्पष्ट केलं. काँग्रेस आपला पाठिंबा शिवसेनेला देणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं. त्यामुळे भिवंडीची पोटनिवडणूक अटीतटीची होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.