मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याबाबत सुरु असलेली वादग्रस्त वक्तव्याची मालिका सुरुच आहे. ‘मोदीला मारु शकतो, शिव्या देऊ शकतो’, या नानांच्या वक्तव्यानंतर भाजपकडून राज्यभरात आंदोलन करण्यात आलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा नाना पटोले यांनी मोदींबाबत आक्षेपार्ह आणि वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा भाजप नेते आक्रमक झाले आहे. माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या नेतृत्वात पटोले यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं, तो पुतळाही जाळण्यात आला.
नाना पटोले यांनी रविवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना “ज्याची बायको पळून जाते, त्याचे नाव मोदी ठरते,” असं आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर भाजप नेत्यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपचे आमदार आणि राज्याचे माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात पटोले यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याविरोधात ‘जोडे मारो’ आंदोलन केलं. त्यांच्याविरोधात तातडीने कारवाई न झाल्यास राज्यभरात भाजप कार्यकर्त्यांकडून पुन्हा एकदा तीव्र निषेध आंदोलनं करण्यात येणार असल्याचं बावनकुळे यांनी यावेळी सांगितलं.
पंतप्रधान मोदींबाबत नाना पटोले यांना बोलताना लाज वाटत नाही. जगात क्रमांक एकचे पंतप्रधान त्यांच्याबाबत हे बोलत आहेत. त्यांनी देशातील 60 कोटी महिलांचा अपमान केलाय. हा वेडा झालेला माणूस आहे, त्याला नागपूरच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती करण्याची गरज आहे. संपूर्ण काँग्रेस पार्टी संपवल्याशिवाय ते राहणार नाही. आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करु. नाना पटोले यांना आम्ही सोडणार नाही, असा इशाराच बावनकुळे यांनी दिला आहे.
दरम्यान, त्यांच्या दुसऱ्या वक्तव्याबाबत विचारलं असता ते वक्तव्य आपलं नाही. मोदी नावाच्या गुंड जे बोलला तेच मी सांगितलं. भाजपला राज्यातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडून हा विषय मोठा करण्यातच रस आहे, अशी टीकाही पटोले यांनी केलीय.
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही नाना पटोले यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतलाय. पटोले यांनी मोदींबाबत केलेल्या वक्तव्यानंतर ज्यांचं लग्न वेळेत होत नाही त्याला काय म्हणणार? असा खोचक सवाल दरेकर यांनी राहुल गांधी यांचं नाव न घेता पटोलेंना विचारलाय. पटोले यांची वक्तव्ये विकृत मानसिकतेतून येत आहेत. काँग्रेसनं त्यांना आवर घातला पाहिजे. पटोले हे आपल्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या कारकिर्दीच्या वैभवशाली परंपरतेचा ऱ्हास करत आहेत, अशी टीकाही दरेकर यांनी केलीय.
इतर बातम्या :