मुंबई : सन 2002 मध्ये विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते आणि विरोधी पक्ष नेते शिवसेनेचे नारायणराव राणे होते.. नारायणरावांनी सरकारच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल केला आणि अध्यक्षांनी तो स्वीकारला… एकदा का अविश्वास ठराव दाखल झाला की सत्ताधाऱ्यांना विश्वासाच्या बाजूने बहुमत सिद्ध करावं लागतं अन्यथा सरकार कोसळतं… 2002 सालातील सरकार हे अत्यंत काठावर टिकलेले सरकार होते… सगळा मामला अपक्ष आमदारांच्या हातात गेला… सरकार टिकले तर एक किंवा दोन मतांनी टिकणार होते किंवा एक दोन मतांनी पडणार होते..
या 2002च्या विधिमंडळात विधानसभेत एकूण दहा अपक्ष आमदार होते… दहापैकी हर्षवर्धन पाटील आणि शिवाजीराव कर्डिले काँग्रेस बरोबर होते, बाकीचे आठ आमदार राणे साहेबांच्या बरोबर होते…
अविश्वास ठराव टिकावणे कर्म कठीण होऊन बसलं होतं.. त्यापेक्षा जास्त सरकारची अर्थात विलासराव देशमुख यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.. अगोदरच सरकार अत्यंत काठावर होतं… काठावरच्या सरकारची कायमच तारेवरची कसरत असते… ती म्हणजे बहुमत टिकवण्यासाठी एक दोन आमदार इकडचे-तिकडे गेले तर सरकार कोसळायला वेळ लागत नाही… त्यामुळे मध्यस्थाला अनेकांच्या नादुरा काढाव्या लागत… सारखी हांजी हांजी करावी लागे… ऊठबस सांभाळावी लागे… हा सर्व कठीण काळाचा मामला असताना अध्यक्षांनी अविश्वास ठराव दाखल करून घेतल्यामुळे काँग्रेसच्या गोटात अत्यंत चिंतेचं आणि काळजीचं वातावरण तयार झालं…
काँग्रेसचे सर्व आमदार तसेच काँग्रेसला पाठिंबा दिलेले आमदार एकत्र रहावेत म्हणून या सर्वांची देखभालीची व्यवस्था हायकमांडने हर्षवर्धन पाटील, दिलीपराव देशमुख आणि कृपाशंकर सिंह यांच्यावर सोपवली होती… त्यातही आमदार सांभाळणं हे काही येरागबाळ्याचं काम नसतं… अविश्वासाचा ठराव दाखल झाला असताना ही बाब अत्यंत नाजूक आणि परीक्षा पाहणारी असते… सर्व काँग्रेस आमदारांची निवास व खानदानाची व्यवस्था बंगळुरु इथल्या संजय खान यांच्या अतिथीगृहात अर्थात विश्रामिकेत करण्यात आली होती…
ही बाब अत्यंत गोपनीय ठेवण्यात आली होती… कारण एकही आमदार फुटणे काँग्रेसला परवडणारे नव्हते… पण झाले उलटेच… पहिल्याच दिवशी आमदार मंडळींची परस्परात भांडणे सुरू झाली… प्रत्येकाची स्वतंत्र खोलीची अपेक्षा होती… संजय खान यांच्या विश्रामिकेत त्या मानाने खोल्या कमी होत्या…पण हर्षवर्धन पाटलांनी शिताफीने आमदारांच्या राहण्याचा प्रश्न सोडवला…
नंतर सर्वात महत्त्वाचा प्रश्न पुढे आला तो म्हणजे त्या विश्रामगृहाच्या व्यवस्थापकाने विचारलं की, ‘या सर्वांचे बिल कोण देणार आहे?’ कारण एका दिवसाचे बिल तीन लाख रुपये होत होते… हा बिलाचा आकडा खूपच मोठ्या असल्यामुळे हर्षवर्धन पाटलांनी व्यवस्थापकाला विचारलं, की ‘तुम्ही एवढे बिल घेता… त्यात काय काय सुविधा देता?’… तेव्हा व्यवस्थापकांनी सांगितले की यात आम्ही सर्व सुविधा देतो… पेयजल वगैरे…
आता सुविधा कमी करुन आमदारांना नाराज करायचे म्हणजे संकटांना आमंत्रण द्यायचे…. कारण आमदार नाराज झाले तर मतदान विरोधात होणार… मग हर्षवर्धन पाटील यांनी गुपचूप व्यवस्थापकांना सांगितलं की टेक्निशन कमी करा… पेयजल नको… त्यामुळे ते तिथे बिल कमी झाले…
दुसऱ्या दिवशी नवीनच प्रश्न उद्भवला… नाश्ता केल्यानंतर सर्व आमदारांनी स्विमिंग पूल वर जाऊन आंघोळी केल्या… त्यात मधुकर चव्हाण, आनंदराव देवकाते हे ज्येष्ठ नेते धोतर परिधान करायचे… त्यांनी पोहून झाल्यानंतर स्विमिंग पूलवर असणाऱ्या छत्र्यांवर धोत्रे वाळत टाकली… चट्ट्यापट्टयांच्या चड्ड्यांमध्ये उघड्याबंब अवस्थेतून ऊन खात बसले… त्याच वेळी काँग्रेस आमदार येथे आहेत याचा सुगावा इलेक्ट्रॉनिक मीडियाला लागला… आणि त्यांनी नेमके ती वाळत घातलेली धोत्रे व उघडेबंब देह यांचे शूटिंग केले… त्याचं थेट प्रसारण देशभर एका न्यूज चॅनेलला केलं…
ते चॅनल काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पाहिलं आणि त्यांनी तात्काळ विलासरावांना फोन केला… आणि विचारलं की, “तुम्ही टीव्ही पाहिलात का?’ नेमका काय गोंधळ सुरु आहे…? पाहिला नसेल तर पाहा जरा… हा गोंधळ संपूर्ण देश पाहतोय…”
मग विलासरावांनी हर्षवर्धन पाटील यांना फोन आला आणि त्यांना विचारलं की, “हर्षवर्धन तुम्ही तिथं नेमकं काय काम करताय…? जरा टीव्ही पाहा… काय चाललंय हे काही कळेल का?”… कधीच हर्षवर्धन पाटलांवर न रागावणारे विलासराव त्यांच्यावर रागावले… म्हणून पाटलांनी धावत पळत जाऊन टीव्ही सुरु केला… एक चॅनल लावलं तर सर्वत्र तीच हेडलाईन व वाळत घातलेली धोत्रे आणि उघडेबंब देह यांचे थेट प्रक्षेपण सुरु होते…
रात्री सोलापूरचे भाजपचे आमदार रवी पाटील यांनी मधुकर चव्हाण देवकाते आणि एक जण अशा तीन आमदारांना जेवायला सोबत नेलं… ज्या तिघांवर आमदार सांभाळण्याची जबाबदारी सोपविण्यात आलेली होती ते दररोज रात्री काउंटिंग करायचे पण त्या रात्री तीन आमदार कमी येत होते… मग टाऊटिंग करणाऱ्या तिघा नेत्यांना घाम फुटायला सुरुवात झाली… आमदार बाहेर जाऊ नये यावर त्यांनी उपाय म्हणून रोज रात्री मेन गेटला कुलूप लावायचं ठरवलं… अशा पद्धतीने सहा दिवस गेले…
अविश्वास ठरावावर मतदानाच्या दिवशी या सर्व आमदारांना मुंबईला आणण्यात आलं आणि ताज हॉटेलमध्ये त्यांची व्यवस्था करण्यात आली… काँग्रेसच्या सहा आमदारांवर निलंबनाची कारवाई होणार होती याची चाहूल हर्षवर्धन पाटलांना अगोदरच होती आणि घडलंही तसंच… काँग्रेसच्या आमदारांप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांची निवास व्यवस्था इंदौर येथे करण्यात आली…. त्यांच्या देखभालीची व मतदानाची जबाबदारी तत्कालीन उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यावर सोपविण्यात आली.. अशा सर्व गमतीजमती काँग्रेस सरकारने 148 आकडा पार करत अविश्वास ठराव फेटाळून लावला.. आणि सरकार स्थिर केलं…
(सदर प्रसंग माजी संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या विधानगाथा या पुस्तकातून घेण्यात आलेला आहे…)
(Narayan Rane had filed a no-confidence motion against Vilasrao Deshmukh’s government Special Story harshavardhan patil Vidhangatha Book)