मुंबई: 102व्या घटना दुरुस्तीवर बोलताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रावर टीका केली होती. जेवायचं निमंत्रण दिलं, पण हात बांधून ठेवले, अशी टीका पवारांनी केली होती. पवारांच्या या टीकेवर केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणेंनी पलटवार केला आहे. तुम्ही परिपक्व राजकारणी आहात. हात सोडवून घ्या, असा टोला नारायण राणे यांनी लगावला आहे. (narayan rane reply sharad pawar over 102 amendment bill)
नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन हा हल्लाबोल केला. केंद्र सरकारने हातपाय बांधून ठेवले नाही. तुम्हाला ते सोडता यायला पाहिजे ना. तुम्ही परिपक्व राजकारणी आहात. पवार साहेबांनी एवढी वर्षे राजकारणात घालवली आहे. त्यामुळे हात बाहेर काढण्याची बुद्धिमत्ता त्यांच्याकडे आहेच, असं सांगतानाच आरक्षण कसं देता येईल हा प्रस्ताव राज्य सरकारने करावा. त्यांना करता येत नाही, म्हणून केंद्राकडे बोट दाखवत आहेत. मराठा आरक्षण द्यायचं मनात नाही म्हणून हा आरोप होत आहे, असा दावा राणेंनी केला.
घटना दुरुस्ती विधेयक लोकसभेत आणि राज्यसभेत चर्चेला आले होते. तुम्ही ज्यांची नावे घेतली किंवा जे आमच्यावर आरोप करत आहेत. ते या घटना दुरुस्तीवर संसदेत बोलले का? हे विधेयक चुकीचं आहे असं म्हटलं का? या विधेयकाचा काही उपयोग नाही, केंद्र सरकार दिशाभूल करत आहे असं का नाही बोलले? माझ्याकडे सर्वांच्या भाषणांच्या प्रती आहेत. कोण काही बोललं नाही. का नाही बोलले?, असा सवाल करतानाच या विधेयकात काय चुकीचं आहे?, असा सवालही त्यांनी केला.
मी समितीचा अध्यक्ष होतो. मी अहवाल दिला. त्यानुसार आरक्षण मिळालं. कोर्टाने मान्य केलं होतं. घटनेच्या कलम 15(4) आणि 16 (4) प्रमाणे सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणा सिद्ध करून आरक्षण देण्याचा राज्य सरकारला अधिकार आहे. घटनेत याची तरतूद आहे. जे सांगतात त्यांनी घटना वाचावी. याच आधारे तामिळनाडूसह 15 राज्यांनी याच कलमांचा आधार देऊन 52 टक्क्यांच्यावर आरक्षण दिलं. 52 टक्क्याच्यावर 15 (4) आणि 16 (4) ने जाता येतं. घटना घ्या, तज्ज्ञ घ्या आणि बघा ते कसं मिळालं. आता जे आलं ती 102 वी घटना दुरुस्ती होती. त्यानुसार महाराष्ट्राला मागास प्रवर्गाची यादी बनविण्याचे अधिकार देण्यात आले. पण काही तरी निगेटीव्ह बोलण्यासाठी विरोधक बोलत आहेत. चांगल्याला चांगलं म्हणणं हा माणुसकीचा धर्म विरोधकांकडे राहिला नाही. काय तरी कारण काढून सरकारला दोष देत आहेत. आपलं नैराश्य दाखवत आहेत, अशी टीका त्यांनी केली.
काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज बैठक होणार आहे. त्याचाही त्यांनी समाचार घेतला. बैठकीबद्दल ऐकून आनंद वाटला. मी 39 वर्षे शिवसेनाप्रमुखांसोबत होतो. त्यांची विचारधारा हिंदुत्वाची होती. त्यांनी हिंदुत्व आणि मराठी माणसासाठी सर्वकाही केलं. त्यांनी सत्तेच्या लोभासाठी हिंदुत्वाचा त्याग केला नाही. आताची शिवसेना लाचारी करत आहे. त्याचा एक भाग म्हणून आजची बैठक होत आहे, अशी खोचक टीका त्यांनी केली. (narayan rane reply sharad pawar over 102 amendment bill)
केंद्रिय मंत्री श्री. नारायण राणे यांची पत्रकार परिषद. https://t.co/cf3f5agCEq
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) August 20, 2021
संबंधित बातम्या:
बाळासाहेबांचं स्मारक दलदलीत, मी पुत्र असतो तर त्यांना इथे येऊच दिलं नसतं; राणेंचा हल्लाबोल
शिवसेनाप्रमुखांच्या स्मृती स्थळावर नारायण राणेंनी काय आशीर्वाद मागितला?; राणेंनी केला मोठा खुलासा
(narayan rane reply sharad pawar over 102 amendment bill)